Gokul Chairman Election | महायुतीची रणनीती २८ ऑक्‍टोबरला, ‘समविचारी’कडून चर्चेची अपेक्षा  
कोल्हापूर

Gokul Chairman Election | महायुतीची रणनीती २८ ऑक्‍टोबरला, ‘समविचारी’कडून चर्चेची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळ चेअरमन निवड बैठकीबाबतची महायुतीची रणनीती २८ ऑक्‍टोबरला ठरणार आहे. समविचारीकडे बहुमत असले तरी बैठकीचा कोरम पूर्ण होत नसल्‍याने चेअरमन निवड बैठकीबाबत दोन्‍ही आघाड्यांच्‍या भूमिकेकडे जिल्‍ह्याचे लक्ष असेल. विशेषत: महायुतीच्या बुधवारी होणार्‍या पार्टी मीटिंगमध्‍ये चेअरमन निवडीचे चित्र स्‍पष्‍ट होईल. त्‍यामुळे ही बैठक महत्त्‍वाची ठरणार आहे. दरम्‍यान, चेअरमन निवडीबाबत समविचारी आघाडीनेही चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा महायुतीकडून व्‍यक्‍त होत आहे.

गोकुळ निवडणुकीत आ. सतेज पाटील यांच्‍या समविचारी आघाडीला १३ जागा मिळत बहुमत मिळाले. तर १२ जागा मिळालेली महायुती काठावर पास झाली आहे. चेअरमन निवड २९ ऑक्‍टोबरला होणार आहे. मात्र, चेअरमन निवडीसाठी घेण्‍यात येणार्‍या बैठकीसाठी १४ संचालक उपस्‍थित असणे महत्त्‍वाचे आहे. दोन्‍ही आघाड्यांकडे बैठकीचा कोरम पूर्ण करणारी संचालकांची संख्‍या नाही. त्‍यामुळे चेअरमन निवड बैठकही अडचणीत सापडली आहे.

जिल्‍हा बँकेमुळे सावध पवित्रा शक्‍य

कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेची निवडणूक तोंडावर आहे. गोकुळमध्‍ये निर्णायक ठराव असतानाही महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. त्‍यामुळे चेअरमन निवड प्रक्रिया महायुतीने ताणून धरल्‍यास पुढील काळात याचे पडसाद उमटण्‍याची शक्यता आहे. त्‍यामुळे जिल्‍हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सावध पवित्रा घेण्‍याची शक्‍यता आहे.

आ. सतेज पाटील यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

चेअरमन निवड बैठकीचा पेच निर्माण झाल्‍याने समविचारीला बैठकीचा काेरम पूर्ण करण्‍यासाठी एका संचालकाची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे एकतर त्‍यांना महायुतीचा एखादा संचालक फोडावा लागेल अथवा मध्‍यमार्ग काढावा लागेल. दरम्‍यान, महायुतीच्‍या काही नेत्‍यांनी समविचारी आघाडीनेही चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केल्‍याने आता आ. सतेज पाटील यांच्‍या भूमिकेकडेही लक्ष असणार आहे.

.. तर चेअरमन निवड कायदेशीर कचाट्यात

गोकुळ चेअरमन निवड बैठकीचा कोरम पूर्ण न झाल्‍यास पहिली सभा तहकूब झाली, तर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. सहकारी संस्‍थेचा पोटनियम म्‍हणजे संस्‍थेचा कारभार चालविण्‍यासाठी मार्गदर्शक सूचना आहेत. त्‍यामुळे पोटनियमानुसार कोरम पूर्ण न झाल्‍यामुळे चेअरमन निवड झाली नाही तर समविचारी आघाडी न्‍यायालयात जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे गोकुळची चेअरमन निवडही कायदेशीर कचाट्यात सापडण्‍याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT