कोल्हापूर : स्वबळाची भाषा, महापलिकेवर आपलाच झेंडा फडकविण्याची घोषणा, इच्छुकांचे पक्षप्रवेश यातून झालेली पक्षाची व नेत्यांची कोंडी यामुळे मार्ग काढताना नेत्यांचीच कोंडी झाली आहे. आता तर जागावाटपावरून शिवसेना नेत्यांतच एकमत होईना. त्यामुळे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले दोन दूत कोल्हापूरला पाठविले असल्याचे समजते. त्यांनाही रात्री उशिरापर्यंत पेच सोडविण्यात यश आले नव्हते. भाजप व राष्ट्रवादीचे नेते हे शिवसेनेबरोबर चर्चेसाठी निमंत्रणाची वाट पाहत थांबले होते. उमेदवारीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार्या इच्छुकांना नेते नॉट रिचेबल असल्याचा संदेश येत होता. दरम्यान, भाजप नेत्यांतही जागावाटपावरून वादावादी झाल्याचे समजते.
शिवसेना नेत्यांची बैठक सुरू होती. मात्र त्यातून एकमत झाले नाही. शिवसेनेत नेत्यांचे एकमत झाले तर चर्चा करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीचे नेते प्रतीक्षेत थांबले होते. मात्र, कोणताही निरोप न आल्यामुळे अखेर रविवारी चर्चा करायची, असे ठरले. मंगळवार, दि. 30 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे. तर भाजपमध्येही नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी परिस्थिती आहे.
दरम्यान महाविकास आघाडीतही सर्व काही ऑलवेल नाही. शरद पवार राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तिसरी आघाडी स्थापन करत समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ठाकरे शिवसेनेला महाविकास आघाडीत काँग्रेसने केवळ 7 जागा दिल्या आहेत. ठाकरे शिवसेनेने आणखी दोन जागांची मागणी केली असून 7 पेक्षा जास्त जागा लढविण्यास काँग्रेसने असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेनेचे उमेदवारही वेटिंगवरच आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या शरद पवार राष्ट्रवादीने तिसरी आघाडी स्थापन केली आहे.
* भाजप, राष्ट्रवादी चर्चेच्या प्रतीक्षेत; तिसरी आघाडी रिंगणात
* ठाकरे शिवसेनेला आणखी दोन जागांची प्रतीक्षा
* ठाकरे शिवसेनेचे उमेदवारही वेटिंगवरच
* काँग्रेसकडून 7 पेक्षा जास्त जागा देण्यास असमर्थता
* शिवसेनेचे ठरल्यावर मग जागावाटपाची चर्चा
* शिवसेनेच्या निरोपाची वाट पाहत भाजप नेते कार्यालयात
* भाजपतही नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता