कोल्हापूर : जिल्हा परिषद सत्तावाटपाच्या फॉर्म्युुल्याबाबत बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि महायुतीचे इतर नेते.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी; उद्या निवडी

महायुतीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; पाच वर्षांत चार अध्यक्ष, चार उपाध्यक्ष, 20 सभापती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील महायुतीच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी तर सभापतिपद एक वर्षासाठी मिळणार आहे. या फॉर्म्युल्यावर महायुतीच्या नेत्यांच्या रविवारी सायंकाळी विमानतळावर झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्हा परिषद निवडणुकीत 68 पैकी 51 जागा मिळवून महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादी 20, भाजप 12, शिवसेना 9, शाहू आघाडी 4, जनसुराज्य 5 आणि 1 अपक्ष महायुतीकडे आहे. त्यामुळे अध्यक्ष महायुतीचाच होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रविवारी कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी तर सभापतीची 4 पदे एक वर्षासाठी देण्याचा निर्णय झाला. महायुतीच्या 51 पैकी 28 सदस्यांना 5 वर्षांत संधी मिळणार आहे. 17 मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड होणार आहे. पण अध्यक्षपदाच्या नावाचा सस्पेन्स कायम आहे.

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, प्रा. जयंत पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम आणि माजी आमदार सुजित मिणचेकर उपस्थित होते.

बांधकाम आणि आरोग्य, अर्थ आणि शिक्षण, समाजकल्याण तसेच महिला बालकल्याण या चार सभापती पदासाठी एका सदस्याला एक वर्ष संधी दिली जाईल. 5 वर्षांत 20 सभापती होतील. उपाध्यक्षांकडे कृषी आणि पशुसंवर्धन समिती राहील. एकूणच महायुतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि सभापतिपद वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. पहिल्या वर्षी अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. यानंतर भाजप, शिवसेना आणि जनसुराज्यकडे जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT