कोल्हापूर : विधान परिषदेसाठी ताकतीने लढणार म्हणणाऱ्या महाविकास आघाडीच्या सहा जणांनी मताचे समीकरण बघून निवडणुकीपूर्वीच पळ काढला. यामुळे महायुतीचे सहाजण बिनविरोध झाले, उर्वरित ११ जणही मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील, असा विश्वास पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
विधान परिषद निवडणुकीतील माघारीवर खासदार संजय राऊत यांनी १५० कोटींचा घोडाबाजार झाल्याचा आरोप केला होता. त्यावर त्यांना काय काम आहे, तरी त्यांनी आकडा कमीच सांगितला. मोठा आकडा सांगायला पाहिजे. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी समोर आणावे, असे सांगत आजपर्यंत ते बोललेले काय खरे ठरले, असा टोलाही देसाई यांनी लगावला.
नाशिकमधल्या दोन गीते बंधूंपैकी एकाने अर्ज माघारी घेतला आहे. दुसऱ्या गीते बंधूंचा अर्ज काल वेळेत माघारी घेता येऊ शकला नाही. शिवसेनेच्या वतीने मंत्री उदय सामंत, भाजपचे गिरीश महाजन तिथे आहेत. कदाचित चर्चेतूनही एखादा चांगला तोडगा निघू शकेल. महायुतीत कोणताही बेबनाव नाही, तसा असता तर मला दोन दिवस सांगलीला पाठवून तानाजी पाटलांचा अर्ज माघारी घ्यायला लावला नसता. किरकोळ कुरबुरी सगळ्याच पक्षात चालतात. तीन पक्षांचे सरकार म्हणजे कुठं तरी भांड्याला भांड लागते. मात्र त्याचा आवाज घराच्या बाहेर जाणार नाही, याची काळजी आम्ही घेत असतो. कोकणात शिवसेना उबाठाच्या बाळा माने यांना आपल्याकडे संख्याबेरीजच नाही, आपला टिकाव लागणार नाही हे कळल्यानंतरच त्यांनी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेताच माने वाईट झाले, त्यावर राऊत लगेचच बोलायला लागले. माने विनायक राऊत यांच्याबद्दल काय म्हणाले ते पहा, माने बोलल्यामुळे त्यांच्यातीलच आतल्या गोष्टी बाहेर आल्या. उबाठात काय चालले हे महाराष्ट्रातील जनतेला कळाले, असेही देसाई यांनी सांगितले.