Gokul Election | महायुतीकडून छत्रपती शाहू शेतकरी आघाडीची घोषणा 
कोल्हापूर

Gokul Election | महायुतीकडून छत्रपती शाहू शेतकरी आघाडीची घोषणा

‘गोकुळ’ निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीसाठी महायुतीकडून शनिवारी (दि. 30) छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा करण्यात आली. महायुती म्हणून ‘गोकुळ’ची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

‘गोकुळ’ निवडणुकीसंदर्भात महायुती नेत्यांची गोपनीय बैठक झाली. बैठकीमध्ये निवडणूक एकत्र लढणे, ठराव गोळा करणे यासह जागावाटप यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. बैठकीनंतर माहिती देताना आमदार विनय कोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती नेत्यांची बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नियोजनाच्या अनुषंगाने सर्व नेत्यांची चांगली चर्चा झाली. गेल्या दोन महिन्यांपासून महायुतीअंतर्गत नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू होते. वादामुळे ‘गोकुळ’ निवडणुकीत महायुती एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आज झालेल्या बैठकीमध्ये नेत्यांमधील वादावर पडदा पडला असून, महायुती म्हणून एकसंधपणे सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम उपस्थित होते.

ठराव आपापल्या ताकदीवर गोळा करणार

बैठकीमध्ये ठराव गोळा करण्याबाबतही चर्चा झाली. महायुतीमधील घटकपक्षांनी आपापल्या ताकदीवर ठराव गोळा करण्याचे ठरले. जागावाटपावरही प्राथमिक चर्चा झाली. ठराव मागणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागावाटपासंदर्भात पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला मुख्यमंत्री फडणवीस निश्चित करतील, अशीही बैठकीत चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT