कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आमदार चंद्रदीप नरके यांची भेट घेत नाराजी दूर केली. 
कोल्हापूर

Gokul Elections | महायुतीची लवकरच व्यापक बैठक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेसिडेन्सी क्लब येथे बैठक बोलवली. बैठकीचे नियोजन गडबडीत झाल्याने विसंवाद झाला. त्यामुळे अन्य नेत्यांना निमंत्रण देता आले नाही. गोकुळ निवडणुकीबाबत महायुतीची लवकरच व्यापक बैठक होईल. जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊनच गोकुळची निवडणूक लढली जाईल, अशी स्पष्टोक्ती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

महायुतीमधील काही मोजक्याच नेत्यांची रेसिडेन्सी क्लब येथे शनिवारी बैठक झाली. बैठकीत अंतर्गत वादावर पडदा पडला. पण यानंतर बैठकीचे निमंत्रण नसल्याने शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी नाराजी व्यक्त केली. तर आमदार शिवाजी पाटील यांनी बैठकीबाबत कल्पनाच नसल्याचे सांगितले. बैठकीत वादावर पडदा पडला पण निमंत्रणावरुन नाराजीचा सूर उमटला.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आ. नरके नाराज झाल्याचे समजताच शनिवारी (दि. 29) रात्री 11 वाजता त्यांची भेट घेवून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बैठकीचे घाईगडबडीत आयोजन झाले. विसंवादामुळे बैठकीचे निमंत्रण देता आले नाही, असे सांगत समजूत काढली. यावेळी गोकुळचे माजी संचालक अजित नरके उपस्थित होते.

महायुती म्हणून लढताना सर्वांना विश्वासात घ्या : आ. नरके

बैठकीचे निमंत्रण नसल्याने पालकमंत्री आबिटकर यांच्यासमोर भावना व्यक्त करताना आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळची निवडणुक महायुती म्हणून लढताना सर्वच नेत्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. निवडणुकीत शिवसेनेची भुमिकाही निर्णायक असणार आहे. करवीर तालुक्यात सर्वाधिक ठराव आहेत. गोकुळच्या तीन निवडणुकांचा अनुभव आहे. पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील संस्थाचेही ठराव आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर खा. धैर्यशील माने, माजी खा. संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, यांच्यासह गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील हे देखिल आता आपल्यासोबत आहेत. त्यामुळे गोकुळ निवडणुकीला सामोरे जाताना सर्वांनाच विश्वासात घेवून पुढे जावे, असे आ. नरके यांनी सांगितले.

आ. शिवाजी पाटील यांना कल्पनाच नाही

आ. शिवाजी पाटील यांना बैठकीची कल्पनाच नव्हती. त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. पण, गोकुळबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील तो मान्य असेल. ही तर पहिली बैठक आहे, पुढे अजून बर्‍याच बैठका होतील, असे सांगत फारसे नाराज नसल्याचे दाखवून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT