कोल्हापूर : पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्या, सरसकट पंचनामे करा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना बुधवारी निवेदन दिले.
विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते, आ. सतेज पाटील म्हणाले, पावसाने शेतीसह अन्य घटकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. सरसकट पंचनामे करा, शेतकर्यांना हेक्टरी रु. 50 हजारांची तसेच अंशत: पडझड झालेल्या घरांनाही सानुग्रह अनुदान द्या.
पावसाचा अलर्ट होता, तरीही पाटबंधारे विभागाने बंधार्यातील बरगे न काढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. याबाबत दक्षता घ्या, अशा सूचनाही आ. पाटील यांनी केल्या. खासदार शाहू महाराज म्हणाले, या पावसाने शेतकर्यांचे वेळापत्रकच कोलमडले आहे. शेतातील पिकांचे नुकसान झालेच आहे, त्याबरोबर नव्याने पेरण्याही झालेल्या नाहीत. यामुळेही मोठे नुकसान होणार आहे.
काँग्रेसचे राहुल पाटील म्हणाले, गतवर्षी बालिंगा पुलाजवळ एकच बोट असल्याने अडचणी आल्या होत्या. यामुळे यावर्षी करवीर तालुक्यात जादा बोटी ठेवा. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, चंदगडमध्ये सर्वाधिक नुकसान होते. कोवाडमध्ये दोन बोटींची व्यवस्था करा. उपनेते संजय पवार म्हणाले, दुर्गम वाड्या-वस्ती, धनगरवाडे या ठिकाणी सुविधा नाहीत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, झाडाच्या फांद्या कोसळण्याची वाट पाहू नका, त्याअगोदर त्याची छाटनी करा. आर. के. पोवार म्हणाले, फांद्या, झाडे रस्त्यावरच पडून राहत आहेत. त्याचे नियोजन करा.
‘माकप’चे कॉ. चंद्रकांत यादव म्हणाले, तीन महिन्यांच्या रेशन धान्य पुरवठ्याचे नियोजन करा. ‘आप’चे संदीप देसाई म्हणाले, खड्डे भरताना मातीचा वापर होत आहे, त्यातून अपघात होत आहेत. सुनील मोदी यांनी रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरून घ्यावेत, तसेच नाल्यातील काढलेला गाळ तसाच काठावर पडून असल्याचे सांगितले.
माजी आ. राजू आवळे, कॉ. सतीशचंद्र कांबळे यांनीही मागण्या केल्या. महादेवराव आडगुळे, दिलीप पवार, क्रांतिसिंह पवार, अतुल दिघे, अनिल घाटगे, सुनील देसाई, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते. केलेल्या मागण्यांबाबत पाठपुरावा करू, योग्य तो निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
यावेळी गांधी मैदानात साचणार्या पाण्याबाबतही विचारणा करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी येडगे यांनी मैदानातून पाणी बाहेर जाण्यासाठी चर काढण्यात आली आहे, त्यातून पाण्याचा निचरा सुरू झाला आहे. ही चर कायम ठेवली जाणार असल्याचे सांगितले.