श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर 
कोल्हापूर

आज महाशिवरात्री : जाणून घ्या महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंग मंदिरांविषयी....

Mahashivratri 2025 : प्रत्येक मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुण्यातील भीमाशंकर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, तसेच मराठवाड्यातील औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि वेरुळ येथील ज्योतिर्लिंग मंदिरे दर्शनासाठी सज्ज झाली आहेत. येथील शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची महाशिवरात्रीला मोठी गर्दी उसळते. ही स्थाने 12 ज्योतिर्लिंगातील असल्यामुळे प्रत्येक मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ः ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथात उल्लेख

श्री त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे ज्योतिर्लिंग आहे. प्राचीन कालावधीपासून सर्वदूर परिचित असलेले शिवाचे स्थान आहे. पौराणिक कथेत गौतम ऋषींनी कठोर तपश्चर्या करत भगवान शंकराला प्रसन्न करत गोदावरीला भूतलावर आणले, अशी आख्यायिका आहे. येथे असलेले त्र्यंबकेश्वराचे मंदिर शिलाहार, यादवकाळात असल्याचे सांगितले जाते. 26 डिसेंबर 1755 रोजी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला. मंदिर महाशिवरात्रीस 16 फेब्रुवारी 1786 रोजी पूर्ण झाले. यादवकालीन साहित्यात ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथांत त्र्यंबकेश्वराचे उल्लेख आढळतात.

औंढ्यातील नागनाथ ः आठवे ज्योतिर्लिंग

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग आहे. आख्यायिकेनुसार, येथे नागवंशीय लोक राहात होते. तक्ष राजाच्या यज्ञामध्ये भगवान शंकराला निमंत्रण दिले नाही म्हणून पार्वतीने यज्ञात उडी घेतली होती. म्हणून तिला सती संबोधले जाते. या सतीचा शोध घेण्यासाठी भगवान शंकर औंढा नागनाथ येथील दंडकारण्यामध्ये आले. याच ठिकाणी कणकेश्वरीच्या रूपाने पार्वती शंकराला भेटली. तेच हे स्वयंभू शिवलिंग अनेक वर्षे जमिनीखाली होते. या ठिकाणी बांधलेले मंदिर पांडवकालीन आहे. पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान : भीमा नदीचा उगम

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आणि पुण्यापासून 110 किलोमीटरवर भीमाशंकर मंदिर आहे. या मंदिरातून भीमा नदीचा उगम होतो. हे मंदिर प्राचीन काळापासूनचे आहे. महाभारत काळात पांडवांनी मंदिर बांधले होते, असे म्हटले जाते. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान महाशिवरात्री यात्रेसाठी सज्ज झाले आहे. मंदिर परिसरात सभामंडप, दर्शन रांग व यात्रेसाठी उपाययोजनांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मुखदर्शन व पास व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळामध्ये मंदिरातील अभिषेक बंद करण्यात आले आहेत.

वेरुळचे घृष्णेश्वर ः काळ्या दगडांत शिल्प

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणार्‍या वेरुळ लेण्या जगप्रसिद्ध आहेत. या लेण्यांपासून जवळच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. 44,000 चौरस फूट क्षेत्रफळावर काळ्या दगडाने बांधलेले आहे, त्यात अनेक शिल्पे आहेत, त्याच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर उत्तम नक्षीकाम आहे. मंदिराच्या गर्भगृहात एक ज्योतिर्लिंग मूर्ती आहे आणि मुख्य दरवाजासमोर भगवान शिवाच्या आवडत्या भक्त नंदीची एक मोठी मूर्ती आहे.

परळी वैजनाथ ः स्पर्श दर्शन महत्त्वाचे

बीड जिल्ह्यात असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्पर्श दर्शन अतिशय महत्त्वाचे समजले जाते. या ज्योतिर्लिंगात अमृत असल्यामुळे ही आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. अमृत व धन्वंतरी दोन्हींचाही वास या शिवलिंगात असल्याने या ज्योतिर्लिंगास वैद्यनाथ नाव प्राप्त झाले आहे. त्यामुळेच परंपरेप्रमाणे या ठिकाणी स्पर्श दर्शनाची रीत आहे. स्पर्श दर्शनाने सर्व बाधा दूर होतात, अशी भाविकांची नितांत श्रद्धा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT