Vishalgad Mahashivaratri Utsav  
कोल्हापूर

Vishalgad Mahashivaratri Utsav | विशाळगडावर 'हर हर महादेव'चा जयघोष; ऐतिहासिक वारसा आणि भक्तीचा अभूतपूर्व संगम

महाशिवरात्रीनिमित्त प्रशासनाच्यावतीने याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : सुभाष पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक विशाळगडावर महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 'ओम नमः शिवाय'चा अखंड जप आणि 'हर हर महादेव'च्या गर्जनेने संपूर्ण गड परिसर शिवमय झाला होता

धार्मिक विधी आणि अभिषेक

उत्सवाची सुरुवात पहाटे ब्राह्ममुहूर्तावर सामाजिक कार्यकर्ते बंडू भोसले यांच्या हस्ते झालेल्या जलाभिषेकाने झाली. पुरोहित निलेश हर्डीकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पौराहित्य केले. गडावरील प्राचीन भगवंतेश्वर मंदिरात शिवलिंगाची विशेष महापूजा आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. विविध नद्यांचे पवित्र जल अर्पण करून करण्यात आलेल्या या पूजेसाठी भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता व सुशोभीकरण

उत्सवानिमित्त अमृतेश्वर मंदिर, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी परिसराची स्वच्छता करून आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली होती. भगवा चौक आणि मुंढा दरवाजा येथील जुना ध्वज बदलून नूतन भगवा ध्वज दिमाखात फडकवण्यात आला. यावेळी उपस्थित शेकडो शिवभक्तांनी ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्राचे पठन केले.

रणवीर दौड

या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे 'बाजीप्रभू समाधी ते मारुती मंदिर' दरम्यान काढण्यात आलेली रणवीर दौड. या स्पर्धेतील विजेत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ​मंदिराबाहेर व मंदिरात आकर्षक फुलांची मांडणी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या उत्सवास कोल्हापूर, मलकापूर, कोडोली, शाहूवाडी आदी भागातील शिवभक्त बांधवांनी तसेच गडवासियांनी हजेरी लावली होती. प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT