AI Healthcare Project | ‘महा-पल्स एआय’ प्रकल्प राज्याच्या आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल : मंत्री आबिटकर 
कोल्हापूर

AI Healthcare Project | ‘महा-पल्स एआय’ प्रकल्प राज्याच्या आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल : मंत्री आबिटकर

कोल्हापुरातून राज्यातील पहिल्या जिल्हास्तरीय एआय आरोग्य प्रकल्पाचा प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा ‘महा-पल्स एआय’ प्रकल्प राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरेल. कोल्हापुरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये तो लागू करण्यात येईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा ( एआय ) वापर करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रारंभ मंत्री आबिटकर यांच्या हस्ते सोमवारी झाला.

मंत्री आबिटकर म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारच्या 'होप' मॉडेलची प्रेरणा घेऊन महा-पल्स प्रकल्प विकसित केला आहे. आयआयटी मंडीचे अधिष्ठाता प्रा. सत्वशील पवार आणि हर्षवर्धन काळोखे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. या प्रकल्पामुळे कामकाजातील त्रुटींना आळा बसेल. रुग्णांना अधिक दर्जेदार व वेळेत आरोग्यसेवा मिळण्यास मदत होईल. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, महा-पल्स एआय प्रकल्प सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात देशाला दिशा देणारा उपक्रम ठरेल. आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, आरोग्य सभापती सारिका नरंदेकर, शिक्षण सभापती शीतल यादव, हर्षवर्धन काळोखे, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, हिवताप सहायक संचालक डॉ. संजय रणवीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. दिलीप वाडकर उपस्थित होते. प्रास्ताविक हर्षवर्धन काळोखे यांनी केले. आभार आयआयटी मंडीचे अधिष्ठाता डॉ. सत्वशील पवार यांनी मानले.

एकाच डॅशबोर्डवर १०४ आरोग्य संस्थांचा आढावा

या प्रकल्पांतर्गत एक सामान्य रुग्णालय, पाच उपजिल्हा रुग्णालये, १५ ग्रामीण रुग्णालये आणि ८३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. जिल्हा कमांड सेंटरमधील डॅशबोर्डवर सर्व संस्थांची माहिती, अलर्ट, महत्त्वाच्या घटना, त्यावरील कार्यवाहीचा तपशील उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT