कोल्हापूर : वाहतूकदार हे सार्वजनिक सेवा पुरविणारा घटक असूनही त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई होत आहे, असा आरोप करत वाहतूकरांच्या शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा येत्या दि. 5 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत बंद करण्यात येईल, असा इशारा बस वाहतूकदार संघटनेने दिला.
राज्यातील ट्रक, टेम्पो, टँकर, बस, टॅक्सी व ऑटो वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बस वाहतूकदारांचा मेळावा झाला. वाहतूकदारांवर अन्यायकारक पद्धतीने कारवाई होत असून, शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सात दिवसांत मागण्या मान्य न केल्यास दि. 5 मार्चपासून वाहतूकदारांचे राज्यव्यापी बेमुदत बंद आंदोलन सुरू होईल. तोपर्यंत लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन, निवेदने आदी मार्गाने आंदोलन सुरू ठेवले जाईल. महाराष्ट्र ट्रान्स्पोर्ट ॲक्शन कमिटीचे किरण देसाई, जिल्हा बस वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज चौगुले यांनी भाषणे केली. यावेळी मेळाव्यात ई-चलन प्रणालीतील कायदेशीर व तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करा, कालबाह्य प्रकरणे रद्द करा व न्यायालयीन नाहरकत द्या. चालकाच्या गुन्ह्यासाठी वाहनमालकाला जबाबदार धरण्याची पद्धत बंद करा, अव्यवहार्य नो-एंट्री नियम व सक्तीची रेट्रो-फिटमेंट अटींचा पुनर्विचार करा, वाहनतळ, अधिकृत थांबे, आपत्कालीन सुविधा व चालक विश्रांती केंद्रांची उभारणी करा आदी मागण्या करण्यात आल्या. मेळाव्यात सुनील खोत, वसीम मुल्ला, अशोक शिंदे, दत्तात्रय पताडे, रफिक राऊत, सुनील मगदूम, पंकज त्रिपाठी, अशोक शिंदे, सुनील खोत, जाकीर तहसीलदार, गौरव कुसाळे, दिलदार मुजावर, अमित भोसले, चिंतन राठोड, स्वरूप तोडकर आदी उपस्थित होते.