मुंबई : महाराष्ट्राच्या डिजिटल आणि हरित पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्याच्या हेतूने रिन्यू विंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या आघाडीच्या कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी राज्य सरकारसोबत ७० हजार कोटींच्या हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी सामंजस्य करार केला. मुंबई महानगर प्रदेशात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची योजना असून, प्रकल्पाची एकूण नियोजित क्षमता ७५० मेगावॅट इतकी असेल.
हा करार राज्य सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत स्वाक्षरी केलेल्या एकूण महत्त्वाच्या करारांचा एक भाग आहे. या करारावर राज्य सरकारच्या उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव आणि इन्व्हेस्ट महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबालागन, तसेच रिन्यूच्या महाराष्ट्रातील राज्य प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या.
२०२८ पासून सुरुवात
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण होण्यासोबतच रोजगाराच्या सुमारे सात हजार नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी दोन हजारांहून अधिक रोजगार थेट स्वरूपाचे असतील. हा प्रकल्प २०२८ पासून टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित ७५० मेगावॅट क्षमतेचा हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क मुंबई महानगर प्रदेशातील विविध ठिकाणी विकसित केला जाणार आहे. यामध्ये पनवेल, खालापूर, तळोजा आणि भोकरपाडा या परिसरांचा समावेश आहे. वाढत्या डिजिटल सेवा, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा स्टोरेजच्या गरजा लक्षात घेता हा प्रकल्प राज्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.