एकनाथ नाईक
कोल्हापूर : इंग्रजांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर राज्यात एसटीची सेवा 1948 मध्ये सुरू झाली. साधी बस ते इलेक्ट्रिकवर धावणारी शिवाई, शिवनेरी आणि नवी लालपरी ही रूपे नागरिकांंनी पाहिली.
बीएसआरटीसीची पहिली बस 1 जून 1948 या दिवशी पुणे ते अहमदनगर (अहिल्यानगर) या मार्गावर धावली. सोमवारी (1 जून) या घटनेला 78 वर्षे होत आहेत. 1948 नंतर बीएसआरटीसीचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नावाने कारभार सुरू आहे. पहिली लक्झरी आराम बस 1964 मध्ये, पहिली वातानुकूलित बस 1965 मध्ये, दुमजली ट्रेलर (डबल डेकर) बस 1967 मध्ये, पहिली शयन (स्लीपर) आसनी बस 1970 मध्ये सुरू झाली. साधी बस म्हणजेच सर्वाची लाडकी ‘लालपरी’ 1999 मध्ये तयार झाली. 2002 मध्ये मिनी आणि मिडीबस दाखल झाल्या. त्यानंतर 2002 मध्येच शिवनेरी बस दाखल झाली. आता इलेक्ट्रिक बसेसमुळे आयाम आला आहे.
एशियाड गेम्ससाठी ‘एशियाड’ बसनिर्मिती
नवी दिल्ली येथे 1982 मध्ये झालेल्या एशियाड गेम्ससाठी (आशियाई क्रीडा स्पर्धा) खेळाडूंच्या प्रवासासाठी महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाच्या विशेष आरामदायी बसेस दापोडी पुणे येथील मध्यवर्ती कार्यशाळेत तयार केल्या होत्या. खेळ संपल्यानंतर या बसेस प्रवासी सेवेसाठी दादर-पुणे मार्गावर चालवल्या. एशियाड बसचे आता ‘हिरकणी’ असे नामकरण केले आहे.
राज्यातील दैनंदिन प्रवासी (लाखात)
एकूण प्रवासी - 56.10
महिला प्रवासी - 16.80; विद्यार्थी - 2.33
ज्येष्ठ नागरिक - (50 टक्के) - 1.59
अमृत ज्येष्ठ नागरिक (100 टक्के) - 7.43
अहिल्याबाई होळकर - 6.28