कोल्हापूर : महाराष्ट्रातून होणारी सॉफ्टवेअर निर्यात गेल्या दशकभरात तिपटीहून अधिक वाढली आहे. 2015 मध्ये राज्यातून 61 हजार 314 कोटी रुपयांची निर्यात होत होती. ती गतवर्षीपर्यंत 1 लाख 83 हजार 847 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर, कोल्हापुरातून 300 कोटींची सॉफ्टवेअर निर्यात होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता एआय, मशीन लर्निंग, बिग डेटा अॅनालिटिक्स आणि क्लाउड कम्प्युटिंगची मागणी वाढत असल्याने येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राची सॉफ्टवेअर निर्यात 3 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सॉफ्टवेअर निर्यातीत देशात महाराष्ट्राने दुसर्या स्थानी झेप घेतली असून केवळ दहा वर्षांत निर्यात तीन पट वाढली आहे. राज्यात पुणे, मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर ठाणे आणि नागपूर या ठिकाणांहून प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी उत्पादने व सेवा पुरवल्या जातात. तज्ज्ञांच्या मते, येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राची सॉफ्टवेअर निर्यात 3 लाख कोटी रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे.
या देशांमध्ये होते सर्वाधिक निर्यात
अमेरिकन आणि युरोपीय बाजारपेठांबरोबरच जपान, दक्षिण कोरिया आणि मध्यपूर्वेतील देशांकडून एआय बेस्ड सॉफ्टवेअर्स आणि ऑटोमेशन सोल्युशन्स यांना सर्वाधिक मागणी आहे. भारतीय सॉफ्टवेअर उद्योगातील वाढत्या योगदानामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय पातळीवर आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.