धीरज बरगे
कोल्हापूर : भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून दुग्ध व्यवसायात महाराष्ट्राचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. दूध उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय दूध उत्पादनात राज्याचा वाटा ६.७ टक्के आहे. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रातील दूध उत्पादन १६६.२६ लाख मे. टनांपर्यंत पोहोचले असून, दहा वर्षांत त्यात तब्बल ६४ टक्के वाढ झाली.
देशात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यात कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि नाशिक हे प्रमुख दूध उत्पादक जिल्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी दूध संघांनी राज्याच्या दुग्ध व्यवसायाला मोठी चालना दिली आहे. ‘गोकुळ’, ‘वारणा’ यासारख्या सहकारी दूध संघांसह अनेक खासगी कंपन्यांनी प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक वाढविली आहे. राज्यात २०२०-२१ मध्ये १३५ लाख मेट्रिक टन इतके दूध उत्पादन होते. २०२४-२५ मध्ये दूध उत्पादन १६६.२६ लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात दूध उत्पादनवाढीस मोठी चालना आहे. शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने दुग्ध व्यवसायाकडे कल वाढत आहे. त्यामुळे आयडीए, ‘गोकुळ’च्या माध्यमातून तरुणांचा व्यवसायातील सहभाग वाढविण्यासाठी पुढील काळात प्रयत्नशील राहणार.योगेश गोडबोले, उपाध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन तथा कार्यकारी संचालक, ‘गोकुळ’ दूध संघ