के. पी. पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Image source- K P Patil Facebook page)
कोल्हापूर

Maharashtra Politics | के. पी. पाटील ठाकरे शिवसेनेत जाणार, 'मातोश्री'वरून भेटीचे निमंत्रण

के. पी. पाटील आणि शिवसेना नेत्यांची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : वृत्तसेवा

बिद्री सहकारी साखर साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील (K P Patil) हे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Maharashtra Politics) 'मातोश्री'वरून त्यांना निमंत्रण आले आहे. यापूर्वी के. पी. पाटील हे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २००४ व २००९ च्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून आले होते.

२०१४ व २०१९ साली शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले. राज्यातील सत्ता बदलात आबिटकर हे शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. गेले काही दिवस महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातील उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे.

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या विरोधात प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी पॅनेल केले होते; मात्र या निवडणुकीत के. पी. पाटील यांनी सर्वच्या सर्व जागा जिंकून कारखान्यावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुतीचे नेते संजय मंडलिक, हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील हे एकत्र होते. विधानसभेसाठी के. पी. पाटील ए. वाय. पाटील या मेहुण्या पाहुण्यांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. ही जागा महायुतीत शिंदे गटाकडे असल्यामुळे के. पी. पाटील व ए. वाय. पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

अलीकडेच या दोघांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची आणि त्यांच्यातील स्पर्धेची चर्चा पुन्हा सुरू झाली. राधानगरी-भुदरगड या मतदारसंघातून दोन वेळा शिवसेनेने विजय मिळविला आहे.

त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे शिवसेनेला ही जागा जाईल या शक्यतेतून के. पी. पाटील यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश नक्की मानला जात आहे. यापूर्वी के. पी. पाटील व शिवसेना नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

राजकीय निर्णय लवकरच : के. पी. पाटील

सध्या मी आजारी असून, गावीच आहे. राजकीय निर्णय घ्यावाच लागेल. तो लवकरच घेतला जाईल. 'मातोश्री'वरून आपल्याला भेटीचे निमंत्रण आले आहे, असे के. पी. पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT