कोल्हापूर

Police Officer Transfer : साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींची बदली, कोल्हापूरचे नवीन SP कोण?

पश्चिम महाराष्ट्रात मोठे बदल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज भारतीय पोलीस सेवा (IPS) मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. हे आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२ (न) आणि २२ (न) (२) मधील तरतुदींनुसार, सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने काढण्यात आले असून तातडीने अंमलात आणले जाणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात मोठे बदल

या बदली सत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये खांदेपालट करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस दलात पोलीस उप आयुक्त म्हणून कार्यरत असलेले निखिल पिंगळे यांची साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) सुरक्षा विभागात पोलीस उप आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी आता निलोत्पल यांच्याकडे सोपवण्यात आली असून, ते यापूर्वी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कोल्हापूरचे मावळते पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस उप महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील फेरबदल

गडचिरोली जिल्ह्यात एम. रमेश यांची पोलीस अधीक्षक म्हणून वर्णी लागली आहे; ते याआधी तिथेच अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. उत्तर महाराष्ट्रातही महत्त्वाचे बदल झाले असून, धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. जळगावचे मावळते पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती आता पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

याशिवाय, पुणे शहर दलातील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिम जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

प्रशासकीय सूचनाशासनाच्या वतीने सह सचिव सुग्रिव धपाटे यांनी हे आदेश डिजीटल स्वाक्षरीने निर्गमित केले आहेत. पोलीस महासंचालकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन या बदली प्रक्रियेबाबत पुढील उचित कार्यवाही करावी, असे निर्देशही या शासन निर्णयात देण्यात आले आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने पदभार स्वीकारण्याचे सूचित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT