एकनाथ नाईक
कोल्हापूर : राज्यात नैसर्गिक प्रसूतीपेक्षा सिझेरियन शस्त्रक्रियेचे (सी-सेक्शन) प्रमाण चिंताजनक आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत राज्यात ६ लाख ४१ हजार ९२८ संस्थात्मक प्रसूती झाल्या. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी ४८ टक्के म्हणजेच तब्बल ३ लाख ७ हजार १८८ प्रसूती सिझेरियनद्वारे होत्या. खासगी रुग्णालयांत सिझेरियनचा आकडा ५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रत्येक १० प्रसूतींमागे ६ प्रसूती शस्त्रक्रियेने होत असल्याचे समोर आले. अनावश्यक शस्त्रक्रियांना आळा घालण्यासाठी राज्य कुटुंब कल्याण विभाग प्रत्येक सिझेरियन शस्त्रक्रियेचे ऑडिट करून कारणे शोधणार आहे.
खासगी रुग्णालयांतील ३ लाख १८ हजार ६८३ पैकी १ लाख ८९ हजार १५२ प्रसूती (५९ टक्के) सिझेरियनने झाल्या. शासकीय रुग्णालयांतील ३ लाख २३ हजार २४५ पैकी १ लाख १८ हजार ३६ (३७ टक्के) प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे झाल्या. महापालिका क्षेत्रांत हे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरातील खासगी रुग्णालयांत ६४ टक्के, तर शासकीय रुग्णालयांत ५० टक्के प्रसूती सिझेरियनद्वारे होत आहेत.
‘सी-सेक्शन’ म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे बाळाला गर्भाशयातून बाहेर काढण्याची प्रसूती पद्धत. आई किंवा बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणे, बाळाची चुकीची स्थिती, प्रसूतीदरम्यान गुंतागुंत किंवा अन्य वैद्यकीय कारणे असल्यास ही शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. मात्र, अलीकडे वैद्यकीय गरज नसतानाही ‘सी-सेक्शन’ प्रसूतींचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
यापूर्वीदेखील काढला होता आदेश
यापूर्वीदेखील ९ जानेवारी २०२४ रोजी कुटुंब कल्याण, माता व बाल संगोपन विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी सिझेरियननंतर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, विभागाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.
नव्या आदेशामुळे होणार बदल
शस्त्रक्रिया झालेल्या दिवशीच डॉक्टरांना वैद्यकीय कारणांचा अहवाल द्यावा लागणार
दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे, तर जिल्हाधिकाऱ्यांना १० तारखेपर्यंत एकत्रित अहवाल
आरोग्य विभागाकडून दर तीन महिन्यांनी अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार
८६% भंडारा
८४% गोंदिया
७७% अमरावती
७५% नागपूर
७४% चंद्रपूर
७१% कोल्हापूर
६८% सातारा
६७% वर्धा
६७% सिंधुदुर्ग
६२% सांगली