सुनील कदम
कोल्हापूर : मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलेल्या ई-सिगारेटचा राज्यभर फैलाव होताना दिसत आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांमध्ये याची वाढती क्रेझ दिसते आहे. यावर बंदी असतानाही ई-सिगारेटचा चोरी-छुपे व्यापार जोमात आहे.
ई-सिगारेट हा धूम्रपानाचा एक इलेक्ट्रॉनिक प्रकार आहे. ई-सिगारेट हे बाहेरून एखादी पेन्सिल किंवा छोट्या पेनसारखी दिसते. त्यामुळे ती सहजासहजी ओळखू येत नाही. त्याचप्रमाणे सिगारेटप्रमाणे याला पेटवावे लागत नाही. केवळ बटन दाबले की काम चालू. शिवाय सिगारेटप्रमाणे याचा धूर किंवा वास येत नसल्यामुळे चारचौघातच काय पण भर वर्गात बसूनही ती ओढता येते.
ई-सिगारेटचे प्रकार!
डिस्पोजेबल, पॉड सिस्टीम, व्हेप पेन आणि बॉक्स मॉड असे ई-सिगारेटचे चार प्रकार आहेत. भारतात ई-सिगारेटच्या प्रत्येक प्रकारावर बंदी आहे. मात्र, आजकाल राज्यभरात या बंदी असलेल्या ई-सिगारेटची चलती असलेली दिसते. चौका-चौकातील पान टपऱ्या आणि प्रामुख्याने युवकांचा वावर असलेल्या कॅफे आणि काही ठराविक हॉटेल्समध्ये याची खुलेआम विक्री होताना दिसत आहे. प्रामुख्याने हरियाणा, गुजरात आणि पंजाब भागातून ही ई-सिगारेटस् येत असल्याचे समजते. सीमावर्ती भागात पोलिसांचे, आरटीओंचे आणि उत्पादन शुल्क खात्याचे शेकडो चेकपोस्ट असताना त्यांच्या नजरेतून ही ई-सिगारेटस् सुटतात कशी काय, हाच गहन सवाल आहे. राज्यात या ई-सिगारेटस्ची कोट्यवधी उलाढाल होत असल्याचे समजते.
ई-सिगारेटचा वापर अत्यंत घातक...
ई-सिगारेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या द्रवामध्ये वेगवेगळे रासायनिक पदार्थ असतात. काही द्रवांमध्ये निकोटिन, सुगंधी रसायने, तर काहींमध्ये गोड किंवा फळांसारखी चव देणारे घटक असतात. आंबा, पुदिना, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला अशा विविध चवींचे प्रकार ई-सिगारेटस्मध्ये आढळतात. या आकर्षक चवींमुळे तरुण वर्ग याकडे आकर्षित होतो. निकोटिन हा शरीरावर परिणाम करणारा महत्त्वाचा पदार्थ आहे. तो मेंदूवर परिणाम करून काही काळासाठी आनंद किंवा शांततेची भावना निर्माण करतो. याच्या वारंवार वापरामुळे शरीराला त्याची सवय लागते आणि हळूहळू व्यक्तीला पुन्हा पुन्हा त्याची गरज वाटते आणि त्यातून व्यसन तयार होते. ई-सिगारेटच्या आहारी गेलेली व्यक्ती सहजासहजी त्यातून बाहेर येऊ शकत नाही. तसेच ई-सिगारेटचे शरीरावर अत्यंत घातक परिणाम कालांतराने आढळून येऊ लागतात.