तानाजी खोत
कोल्हापूर : मध्यमवर्गाने बचत आणि गुंतवणुकीची पारंपरिक कल्पना आता पार बदलून टाकली आहे. एकेकाळी बँकेत मुदत ठेव आणि सोने हेच गुंतवणुकीचे विश्वासार्ह पर्याय मानले जात होते. मात्र, कोरोनानंतर चार वर्षांत शिस्तबद्ध गुंतवणूक योजना (एसआयपी) हा खात्रीशीर जादा परताव्याचा नवा पर्याय म्हणून पुढे आला आहे. चक्रवाढ व्याजामुळे मिळणारा परतावा आणि फंडात होणारी सततची वाढ, यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारही 500 ते 1,000 रुपयांपासून ‘एसआयपी’ करीत आहेत. परिणामी, या माध्यमातून राज्यात दरमहा 8 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक होत आहे.
2021 मध्ये देशातील मासिक ‘एसआयपी’चा ओघ जेमतेम 8 हजार कोटी रुपये होता, तो 2025 मध्ये 29 हजार कोटींहून अधिक झाला आहे. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस् इन इंडिया’च्या (अॅम्फी) ताज्या आकडेवारीनुसार, देशभरात सुरू असलेल्या या ‘एसआयपी’ क्रांतीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशातील एकूण म्युच्युअल फंड गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 30 टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये मुंबईची आर्थिक ताकद जास्त असून पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसारखी शहरे वेगाने नवीन छोटे गुंतवणूकदार तयार करत आहेत.
डिजिटल सुविधा आणि कमी रकमेतून सुरुवात करण्याची सोय, यामुळे या लहान शहरांतील नोकरदार आणि छोटे व्यापारीही आता भविष्यकालीन मोठी उद्दिष्टे साधण्यासाठी बाजारात उतरले आहेत. ‘एसआयपी’ने हे सिद्ध केले आहे की, गुंतवणूक क्षेत्र आता मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाच्या आवाक्यात आले आहे. ‘एसआयपी’ फसव्या योजनांप्रमाणे अव्वाच्या सव्वा परताव्याचा दावा करत नाही.
कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या वाढणार्या शहरांतील तरुण पिढी आता पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा ‘एसआयपी’ला प्राधान्य देत आहे. डिजिटल माध्यमातून सुलभ गुंतवणूक व आकर्षक परताव्याची शक्यता जमेच्या बाजू आहेत.