पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमानसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित 13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी या क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून होणार आहे. द फर्न हॉटेल, कोल्हापूर येथे हे विकास समिट होत असून, त्याचे थेट प्रक्षेपण पुढारी न्यूज चॅनेलवरुन होईल.
'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' च्या माध्यमातून होणाऱ्या चर्चेत उद्योग, महिला कल्याण, आरोग्य आणि कृषी हे विषय केंद्रस्थानी असतील. यावेळी महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकास धोरणांचा राज्यातील मंत्री, समाजसेवक, धोरणकर्ते यांच्या चर्चेतून रोडमॅप आखला जाईल. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत या कार्यक्रमातील चर्चेत सहभागी होत असून ते राज्याच्या उद्योग विकासाची दिशा स्पष्ट करणार आहेत.
आज देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के आहे. तर दुसर्या क्रमांकावरील तामिळनाडूचा वाटा ८.७ टक्के आहे. परदेशी गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात राज्य क्रमांक एकवर आहे. विदेशी पर्यटकांची पसंतीही महाराष्ट्र आहे. राज्याचे स्थूल उत्पन्न ४० लाख ५० हजार लाख कोटी इतके आहे.
जगभरातल्या उद्योग आणि गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षांत ५ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषद महाराष्ट्रातील उद्योगाच्या प्रगतीसाठी लक्षवेधी ठरली. राज्य सरकारने महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-२०२४ आखले आहे. या धोरणामुळे राज्यात सुमारे ५ लाख इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. यातून सुमारे ३० हजार ५७३ कोटी उत्पन्न मिळणार आहे. गेल्या महिन्यातच छत्रपती संभाजीनगर मध्ये हायब्रीड कार्स उत्पादनाची २० हजार कोटींची गुंतवणूक टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या प्रकल्पासाठी करार झाला आहे. विदर्भात सुरजागडसारख्या दुर्गम ठिकाणी १० हजार कोटींचा ग्रोनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प सुरु होतोय. 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील उद्योगाच्या सर्वांगिण विकास धोरणांवर चर्चा होणार आहे.