आशिष शिंदे
कोल्हापूर : कुटुंबाची जबाबदारी, नोकरी-व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी सांभाळणाऱ्या पुरुषांच्या आरोग्याच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात उल्लेखनीय स्थान मिळवले आहे. राज्यातील पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७०.७ वर्षे असून, देशातील सर्वाधिक आयुर्मान असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. जम्मू-काश्मीर, केरळम, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. पुरुषांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्याची ही कामगिरी सकारात्मक मानली जात आहे.
जागतिक पुरुष दिनानिमित्त पुरुषांच्या आरोग्याचा, आरोग्यविषयक जागरूकतेचा आणि स्वतःसाठी वेळ देण्याच्या गरजेचा मुद्दा अधोरेखित होत आहे. देशातील पुरुषांचे सरासरी आयुर्मान ६८.५ वर्षे असताना महाराष्ट्रातील पुरुषांचे आयुर्मान ७०.७ वर्षे आहे. म्हणजेच राज्यातील पुरुषांचे आयुर्मान राष्ट्रीय सरासरीपेक्षा २.२ वर्षांनी अधिक आहे, तर राज्यातील महिलांचे आयुर्मान ७५.२ वर्षे आहे.
आरोग्यासाठी वेळ काढा
पुरुषांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तंबाखू व मद्यापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. हृदयविकार, मधुमेह आणि फुफ्फुसांच्या आजारांपासून बचावासाठी वेळेत तपासणी आणि उपचार घेणे आवश्यक आहे. कुटुंबासाठी सतत धावणाऱ्या पुरुषांनी स्वतःच्या आरोग्यासाठीही वेळ काढावा, हाच जागतिक पुरुष दिनाचा महत्त्वाचा संदेश आहे.
नागरिकांच्या आरोग्यविषयक स्थितीत बदल
महाराष्ट्रात २०१८-२२ या कालावधीत पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७०.५ वर्षे होते. त्यात पुढील कालावधीत वाढ होऊन ते ७०.७ वर्षांवर पोहोचले. महिलांच्या आयुर्मानातही ७४.७ वरून ७५.२ वर्षांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्यविषयक स्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहेत.