Maharashtra-Karnataka border | महाराष्ट्र-कर्नाटक सीमा बनली गुटखा तस्करीचा महामार्ग Pudhari File Photo
कोल्हापूर

Gutkha Smuggling | महाराष्ट्र-कर्नाटक सीमा बनली गुटखा तस्करीचा महामार्ग

रोज 200 कोटींची उलाढाल; कोल्हापूर, सांगलीत बंदीचा फज्जा

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागासह पुणे- बंगळूर महामार्गावर परप्रांतीय गुटखा तस्करांनी दहशत निर्माण केली आहे. सीमाभाग, गोवा परिसरात अडीचशेवर छुप्या अड्ड्यांतून गुटख्यांची बेधडक निर्मिती होत आहे. महामार्गावर रोज किमान 200 ते 225 कोटींची गुटखा तस्करी होत असतानाही संबंधित यंत्रणांनी झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. यामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात गुटखा बंदी आदेशाचा फज्जा उडाला आहे.

गुटख्याची तस्करी करणार्‍या दोन परप्रांतीय टोळ्यांना वडगाव पोलिसांनी किणी टोल नाका परिसरात बेड्या ठोकून सुमारे एक ते सव्वा कोटीचा गुटखा हस्तगत केला आहे. दि. 22 जुलैला झालेल्या कारवाईत 56 लाखांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त केला. लातूर जिल्ह्यातील चालकाला ताब्यात घेऊन परप्रांतीय तस्करासह कर्नाटकातील काही सराईताची नावे निष्पन्न झाली. पाठोपाठ दि. 19 रोजी वडगाव पोलिसांनी आणखी एक कंटेनर ताब्यात घेऊन 78 लाखांचा गुटखा हस्तगत केला. गुटखा तस्करीप्रकरणी पोलिसांनी चालक शहजाद महमद मुबीनखान (रा. उत्तर प्रदेश), रिजवान अहमदखान ऊर्फ रजा (रा. उत्तर प्रदेश) याला बेड्या ठोकल्या. संशयितांकडून गुटख्याचा मोठा साठा हस्तगत केला. कागल-कोगनोळी परिसरात गस्ती पथके रात्रंदिवस कार्यरत असतानाही गुटखा, गोव्यातून विदेशी दारू आणि अमली पदार्थांची बेधडक तस्करी सुरू आहे.

दोन-तीन वर्षांत गुटखा तस्करीचे लोण वाढतच राहिले आहे. हप्तेगिरी आणि चिरीमिरीला भुलून यंत्रणा बघ्याची भूमिका घेत आहे. स्थानिक गुन्हेगारांना घसघशीत कमिशनचा देण्याचा फंडा सुरू झाल्याने गुटखा तस्करीसाठी सराईत टोळ्यांना मोकळे रान मिळाले आहे. परप्रांतीय टोळ्यांचा आर्थिक उलाढालीचा पसारा वाढतच चालला आहे. सीमाभाग, हुबळी- धारवाड परिसरासह गोव्यातील अड्ड्यांमधून घातक गुटख्यांची निर्मिती केली जाते. निकृष्ट दर्जाची सुपारी, नशेली सुंगधी तबाखू, निकोटीन, भेसळयुक्त केमिकलचा अतिवापर करून तयार केलेल्या गुटख्यामुळे क्षणार्धात झिंग येते. कालांतराने डोके गरगरणे, मळमळणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात.

प्रशासनाला खबरबात नसावी?

शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे परिसरासह गजबजलेल्या बाजारपेठांमधील टपर्‍यांमधूनही गुटख्यांची बेधडक तस्करी केली जात आहे. कोल्हापूर- सांगली बायपास रोडवर पहाटेपर्यंत गुटख्यांची तस्करी सुरू असते. यंत्रणेला त्याची खबरबात नसावी का, हा संशोधनाचा विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT