राज्यात पावसाचे थैमान सुरूच  file photo
कोल्हापूर

Maharashtra rainfall : राज्यात पावसाचे थैमान सुरूच

17 जिल्ह्यांतील 14 लाख एकरवरील पिकांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशातच पुढचे दोन दिवस रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा यांसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मराठवाड्यात पावसाने सर्वाधिक नुकसान केले असून पावसाने आतापर्यंत 11 जणांचा बळी घेतला आहे. साडेतीन लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली, तर 588 घरांची पडझड झाली.

मुंबई शहर व उपनगरात मंगळवारी पावसाने अक्षरशः कहर केला. ठिकठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडल्यामुळे चहुकडे पाणीच पाणी झाले. रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झाला. बेस्ट बसही अनेक ठिकाणी अडकून पडल्या. त्यामुळे मंगळवार मुंबईकरांसाठी प्रचंड त्रासदायक ठरला. मुंबईच्या मालाडमध्ये 24 तासांत 361 मि.मी. इतका विक्रमी पाऊस पडला. राज्यातील अतिवृष्टीमुळे 12 ते 14 लाख एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जवळपास 17 जिल्ह्यांतील शेतीला मोठा फटका बसला असून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मंगळवारी रायगड जिल्ह्यात ताम्हाणी घाटात 320 मिमी विक्रमी पाऊस झाला, त्याखालोखाल पावणे तीनशे मिमी पाऊस माथेरानमध्ये झाला. मुरूड तालुक्यातील मिठेखार येथे दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शाळांनाही दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे 20 आणि 21 ऑगस्ट रोजी शाळा बंद राहणार आहेत. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमामात अतिवृष्टी सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवस कोसळणार्‍या पावसाने मंगळवारी कहर केला असून, जिल्ह्यातील बहुतांशी सर्व तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील वाशिष्ठी, कोदवली, नारंगी, अर्जुना, बावनदी व शास्त्री नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. तसेच खेड येथील जगबुडी नदी अद्याप ही धोका पातळीवर वाहत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

राज्यात वीस जिल्ह्यांत आज जोर‘धार’

राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मोठा पाऊस राहणार आहे. रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असून, दोन्ही जिल्ह्यांतील घाटमाथ्यांना ’रेड अलर्ट’चा इशारा मिळाला आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारपासून (दि. 21) राज्यातून मोठा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT