सुनील कदम
कोल्हापूर : राज्यातील फौंड्री उद्योग अभूतपूर्व संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांत स्थानिक पातळीवर वाढलेले कच्च्या मालाचे दर, आखातील युद्धामुळे निर्माण झालेला ऑईल आणि गॅसचा तुटवडा, तशातच ट्रम्प टॅरिफमुळे रखडलेली आणि न परवडणारी निर्यात यामुळे राज्यातील फौंड्री उद्योग कोसळून पडण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्र आघाडीवर!
देशात 4500 फौंड्री उद्योग आहेत. त्यापैकी 1000 हून अधिक फौंड्रीज एकट्या महाराष्ट्रात आहेत. वेगवेगळ्या मशिनरींना लागणारे ब्लॉक्स आणि पिस्टन्स, शेतीपंप आणि शेतीपंपांचे पार्टस्, मशिनरींसाठी लागणारे व्हॉल्व्ह, रेल्वे डबे आणि इंजिनचे पार्टस्, यासह विविध उत्पादने या फौंड्री उद्योगांमधून होतात. देशात उत्पादित होणाऱ्या फौंड्री उत्पादनांपैकी 25 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून होते.
20 लाख टन निर्यात!
देशातून दरवर्षी सरासरी 80 लाख ते एक कोटी टन फौंड्री उत्पादने युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठामध्ये निर्यात होतात. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा वार्षिक सुमारे 20 लाख टनाचा आहे. यावरून राज्याच्या औद्योगिक विकासात फौंड्री उद्योगाचा वाटा किती मोठा आहे, त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही. फौंड्री उद्योगामुळे राज्यातील 3 लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो, तर जवळपास 20 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो.
कच्च्या मालाच्या किमती! गेल्या वर्षभरापासून फौंड्री
उद्योगासाठी लागणाऱ्या स्थानिक बाजार पेठेतील लोखंड, ऑईल, गॅस, कोळसा आणि वाळूच्या किमती जवळपास 25 ते 30 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. मजुरीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तशातच आखाती युद्ध सुरू झाल्यापासून तर ऑईल आणि ऑईलजन्य मालाच्या किमतीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फौंड्रीसाठी आवश्यक असलेल्या गॅसचा पुरवठा तर पुरता विस्कळीत झाला आहे. त्यामुळे फौंड्री उद्योगाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
टॅरिफचा निर्यातीला फटका!
राज्यातील फौंड्री उद्योग आधीच वेगवेगळ्या संकटांशी मुकाबला करीत आहे. तशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर 18 टक्के आयातशुल्क लागू केल्यामुळे अमेरिकेत निर्यात होणाऱ्या फौंड्री उत्पादनांवर आणखी एक संकट कोसळले आहे. अमेरिकेच्या वाढीव आयात शुल्कामुळे निर्यात आतबट्ट्याची होऊन बसली आहे. त्यातच आखातात युद्धाचा भडका उडाल्यामुळे युरोपियन बाजार पेठामध्ये होणारी निर्यातही ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्यातील फौंड्री उद्योग शेवटचे आचके देण्याच्या अवस्थेत येवून ठेपला आहे.
कोल्हापूर ही फौंड्री उद्योगाची राजधानी...!
राज्यात असलेल्या एक हजार फौंड्री उद्योगांपैकी 450 फौंड्रीज एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. देशातून निर्यात होणाऱ्या फौंड्री उत्पादनांपैकी 10 टक्के उत्पादने कोल्हापूर जिल्ह्यातून निर्यात होतात. यावरून कोल्हापूरच्या औद्योगिक विश्वात फौंड्री उद्योगाचे महत्त्व अधोरेखित होते. या माध्यमातून जिल्ह्यातील 1 लाखावर लोकांना प्रत्यक्ष, तर 7 ते 8 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. कोल्हापूरच्या खालोखाल सांगली, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये फौंड्री उद्योगाचा बऱ्यापैकी विस्तार झालेला दिसतो.
कच्च्या मालाचे आणि मजुरीचे दर गेल्या काही दिवसात 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. तशातच अमेरिकेने वाढविलेले आयातशुल्क आणि आखाती युद्धामुळे निर्यातही रोडावत चालली आहे. ऑईलसह गॅसचा पुरवठा कमी पडू लागला आहे. त्यामुळे एकूणच राज्यातील फौंड्री उद्योग अभूतपूर्व संकटात सापडला आहे.- नीरज झंवर, फौंड्री उद्योजक