कोल्हापूर : महाराष्ट्र फुटबॉल लीग (एमएफएल) स्पर्धेची माहिती देताना केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे व प्रो स्पोर्टस्चे संचालक अनिरुद्ध पोले. सोबत नंदकुमार बामणे, माणिक मंडलिक, प्रा. अमर सासने, राजेंद्र दळवी.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Maharashtra Football League | कोल्हापुरात मे महिन्यात महाराष्ट्र फुटबॉल लीगचा थरार

आयपीएल, आयएसएलच्या धर्तीवर आयोजन; छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगणार सामने

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राजाश्रय आणि लोकाश्रयामुळे शतकोत्तर परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या रांगड्या फुटबॉल खेळाला व्यावसायिकतेचे पाठबळ मिळून तो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचावा. मैदान गाजविणार्‍या इथल्या खेळाडूंना भक्कम आर्थिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने आयपीएल व आयएसएलच्या धर्तीवर महाराष्ट्र फुटबॉल लीगचे आयोजन (एमएफएल) करण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (एआयएफए) सदस्य व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) उपाध्यक्ष आणि केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील चार शहरांतून 500 खेळाडूंची निवड

महाराष्ट्र फुटबॉल लीगचा प्रारंभ कोल्हापुरात आगामी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे. स्पर्धेत राज्यातील विविध शहरांचे प्रतिनिधित्व करणार्‍या 10 वरिष्ठ पुरुष संघांचा सहभाग असणार आहे.

संघातील खेळाडूंची निवड फ्रँचायझी (बोली) पद्धतीने केली जाणार आहे. प्रत्येक संघात एकूण 20 खेळाडूंचा समावेश असणार आहे. पुणे, मुंबई, नागपूर व कोल्हापूर या चार प्रमुख शहरांत एमएफएलसाठीच्या निवड चाचण्या आयोजित करून त्यातून 500 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

छत्रपती शाहू स्टेडियमवर डे-नाईट सामने

मे महिन्याच्या शेवटी 15 दिवसांच्या कालावधीत ही स्पर्धा होणार असून, दररोज डे-नाईट पद्धतीने दोन सामने होतील. स्पर्धेचे संयोजन कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) आणि प्रो स्पोर्टस् यांच्यातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती प्रो स्पोर्टस्चे अनिरुद्ध पोले यांनी दिली. यावेळी केएसएचे सचिव माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, प्रा. अमर सासने, राजेंद्र दळवी उपस्थित होते.

कोल्हापूरच्या फुटबॉलपटूंना प्राथमिकता

महाराष्ट्र फुटबॉल लीगमध्ये सहभागी 10 संघांत होस्ट सिटी (यजमान शहर) म्हणून कोल्हापुरातील फुटबॉलपटूंना प्राथमिकता देण्यात येणार आहे. प्रत्येक संघात कोल्हापूरच्या 3 असे एकूण 30 स्थानिक खेळाडू घेण्याची सक्ती असणार आहे. याशिवाय लीगसाठी सुमारे महिनाभर मैदान स्थानिक स्पर्धांसाठी उपलब्ध होणार नसल्याने संघ व खेळाडूंचे होणारे आर्थिक नुकसानीचा मोबदलाही देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT