कोल्हापूर : कोल्हापूर-गोंदिया ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’चा लांबचा प्रवास आता अधिक आरामदायी होणार आहे. या गाडीचे पारंपरिक आयसीएफ कोच बदलण्यात आले असून रविवार, दि.1 जून पासून एलएचबी कोचसह ही गाडी कोल्हापूर स्थानकातून सुटली. यानिमित्त रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर स्थानकातून सुटणार्या कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-तिरुपती ‘हरिप्रिया एक्स्प्रेस’ या दोन गाड्यांना एलएचबी कोच आहेत. रविवारपासून त्यात आणखी एका गाडीची भर पडली. ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ 18 एलएचबी कोचसह गोंदियाच्या दिशेने दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी रवाना झाली.
लाल रंगाच्या या नव्या कोचना फुगे आणि पुष्पमाला घालून सजवण्यात आले होते. प्रवाशांसह गाडीचे लोको पायलट तसेच अन्य कर्मचार्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाय बियाणी, रेल्वे पँसेजर संघटनेचे अनिल तराळ, अरिहंत जैन फौंडेशनचे जयेश ओसवाल, स्थानक प्रबंधक आर. के. कामत आदींसह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर पुणे मार्गावर सध्या धावणार्या सह्याद्री एक्स्प्रेसचेही डबे बुधवारपासून बदलण्यात येणार आहेत. नव्या एलएचबी कोचमुळे 18 डब्यांची ही गाडी 16 डब्यांची होणार आहे. दरम्यान कोल्हापूर स्थानकातून सुटणार्या सर्वच गाड्याचे जुने आयसीएफ डबे बदलून एलएचबी कोच जोडावे तसेच ‘महाराष्ट्र’ आणि ‘सह्याद्री’ एक्स्प्रेस कोच बदलण्याने या गाड्यांचे चार जुने आयसीएफ कोच (रेक) उपलब्ध होणार आहेत. ते वापरून कोल्हापूर-नागपूर आठवड्यातून दोनवेळा सुटणारी गाडी दररोज सोडावी, अथवा कोल्हापूर-सोलापूर मार्गावर दररोज गाडी सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.