कोल्हापूर : कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. यासह सध्या कोल्हापूर-पुणे मार्गावर स्पेशल एक्स्प्रेस म्हणून धावणार्या सह्याद्री एक्स्प्रेसचे डबे बदलणार आहेत. या दोन्ही गाडीसाठी असणारे आयसीएफ कोच बदलून नव्या तंत्रज्ञानाचे एलएचची कोच वापरण्यात येणार आहेत.
राज्यातील सर्वात लांब अंतर आणि सर्वाधिक कालावधीचा प्रवास असणारी रेल्वे म्हणून महाराष्ट्र एक्स्प्रेस ओळखली जाते. या गाडीला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. पश्चिम महाराष्ट्रातून, खानदेशमार्गे विदर्भात जाणार्या या गाडीचा प्रवास सुमारे 26 तासांचा आहे. मात्र, हा प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसह सध्या धावणार्या कोल्हापूर-पुणे स्पेशल (सह्याद्री एक्स्प्रेस) या गाडीचे डबे बदलून ते एलएचबी करण्यात येणार आहेत. कोल्हापूर स्थानकातून सुटणार्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस व कोल्हापूर-तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस या दोन गाड्यांना एलएचबी कोच बसविण्यात आले आहेत. मात्र, हे कोच दक्षिण मध्य रेल्वेने बदलले आहेत. कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या निमित्ताने मध्य रेल्वेकडून कोल्हापुरातून सुटणार्या गाडीसाठी प्रथमच एलएचबी कोचचा वापर केला जाणार असून टप्प्याटप्प्याने अन्य गाड्याच्याही डब्यांचे रूपांतर एलएचबी कोचमध्ये केले जाणार आहे.
एलएचबी कोचमुळे या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची एकूण क्षमता घटणार आहे. सध्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला एकूण 20 डबे आहेत. मात्र, एलएचबी कोच लावल्यानंतर ती संख्या 18 इतकी होणार आहे. कोल्हापूर-पुणे स्पेशल ट्रेनला सध्या आयसीएफचे एकूण 16 डबे आहेत. या गाडीला एलएचबीचे मात्र एकूण 14 कोच लावण्यात येणार आहेत. डब्यांची संख्या कमी होणार असली तरी आयसीएफच्या तुलनेत एलएचबी डब्यात प्रवासी आसन क्षमता अधिक असल्याने एकूण प्रवासी क्षमता मात्र वाढणार आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेस
दि. 1 जूनपासून कोल्हापूरहून
दि. 3 जूनपासून गोंदियाहून
पुणे स्पेशल सह्याद्री एक्स्प्रेस
दि.4 जूनपासून कोल्हापूरहून
दि.5 जूनपासून पुण्याहून