milk file photo
कोल्हापूर

Milk adulteration racket : ‘दूध आणि दुग्धजन्य’ पदार्थांमध्ये ‘जीवघेणी भेसळ’!

दुधातील भेसळीमुळे अनेकांना रक्तदाब व हृदयविकाराची ‘देणगी’

पुढारी वृत्तसेवा

राज्यातील अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळ आणि अवैध खाद्यपदार्थ विक्रीविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुधातील भेसळीवर हा एक प्रकाशझोत...

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यात आजघडीला सर्वाधिक आणि सर्वात जीवघेणी भेसळ कशात होत असेल, तर ती दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये. मानवी आरोग्याच्या दृष्टीने ही भेसळ इतकी घातक आहे की, केवळ दुधामुळे लहान बालकांपासून ते वयोवृध्दापर्यंत लाखो लोकांना अनेक दुर्धर आजारांनी ग्रासून सोडले आहे.

शुध्द दूध झाले दुर्मीळ!

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोण, कशासाठी आणि कशाची भेसळ करेल, याची शाश्वती राहिलेली नाही. ग्रामीण भागात मिळणारं घरगुती रतिबाचे दूध सोडले, तर शुध्द दूध मिळणे जवळपास दुरापास्त होऊन बसले आहे. रतिबाच्या दुधातही काहीवेळा पाणी मिसळलेले दिसून येतेच. गायी-म्हैशींच्या कासेतून बाहेर पडल्यानंतर त्या दुधात कशाकशाची भेसळ होईल, याचा अंदाज लावणे कठीण होऊन बसले आहे. दुधाची फॅट वाढविण्यासाठी अनेकवेळा दूध उत्पादक किंवा गवळी मंडळी त्यात चक्क युरिया आणि सॅकरीनसारखी रसायने टाकताना दिसतात. असे दूध दूध संघांमध्ये गेल्यानंतर तिथली मंडळी या दुधातील झाडून सगळा स्निग्धांश काढून घेऊन दूध म्हणून पांढऱ्या रंगाचं पाचकळ पाणी ग्राहकांच्या माथी मारतात. याशिवाय गोडेतेल आणि अंघोळीच्या शॅम्पूचा वापर करून बनविण्यात येणाऱ्या बनावट दुधाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसत आहे.

भेसळीचा कहर!

दुग्धजन्य पदार्थांतील भेसळही अनेक प्रकारची आहे. साजूक तुपात चक्क गव्हाचा किंवा तांदळाचा रवा मिसळला जात आहे. तूप आणि लोण्यात डालडा मिसळून विकला जात आहे. मलईदार लस्सी म्हणून बाजारात मिरवणाऱ्या अनेक लस्सींमध्ये तांदळाचे पीठ मिसळले जात आहे. दह्यामध्ये गवारीची पावडर, तर ताकाची चव चांंगली लागण्यासाठी त्यामध्ये भलती-सलती रसायने मिसळण्याचे उद्योग केले जात आहेत. श्रीखंड, आम्रखंड अशा पदार्थांमध्ये तांदळाचे पीठ आढळून येताना दिसत आहे. खव्यामध्येही पिठी साखर आणि तांदळाचे पीठ मिसळले जाताना दिसत आहे.

आईस्क्रिम की डालडा!

डालडामिक्स आईस्क्रिम हा भेसळ बाजारातील एक भलताच प्रकार आहे. दुधाच्या शुध्द मलईपासून बनविलेले आईस्क्रिम आणि डालडामिक्स आईस्क्रिम हे सहजासहजी ओळखू येत नसल्याने अनेक बाजारू आणि बनावट कंपन्यांनी बाजारात डालडामिक्स आईस्क्रिमचा रतिब घालायला सुरू केल्याचे दिसत आहे. खऱ्या दूध मलईपासून बनविलेली आईस्क्रिम फार फार तर आठ-दहा दिवस टिकू शकतात. यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांत काही बाजारू आणि बनावट कंपन्यांनी बाजारात बनावट आईस्क्रिमचा पुरवठा करायला सुरूवात केल्याचे दिसत आहे. यापैकी किती कंपन्या नोंदणीकृत आणि किती कंपन्या बेकायदेशीर याचा सर्वसामान्यांना थांगपत्तासुध्दा नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT