कोल्हापूर : बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त 1 रुपयात होत असतानाही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली धुमाकूळ घालत एजंट बांधकाम कामगारांना लुबाडत होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले. तसेच प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्ह्यात 12 कार्यालये सुरू केली. यामुळे कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वत: जाऊन नोंदणी, नूतनीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी ग्रामसेवकांच्या दाखल्यासह सर्व कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. यातून खरे बांधकाम कामगार कोण आणि खोटे कोण हे उघडकीस येणार आहे.
राज्यात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी झाल्याची सर्वत्र ओरड होत होती. खरे बांधकाम कामगार वगळून अन्य लोकच त्याचा लाभ उठवत असल्याच्या तक्रारी होत्या. याला आवर घालण्यासाठी कामगार खाते आणि मंडळाच्या वतीने तालुक्याला कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नोंदणीसाठी कामगार दोन महिने चकरा मारत त्या थांबणार आहेत. तसेच त्या कार्यालयात नोंदणी झाली की नाही, हे स्पष्ट सांगितले जाणार आहे. दिवसभर घाम गाळून प्रचंड मेहनतीची कामे करणार्या बांधकाम कामगारांच्या भविष्यासाठी मंडळाने ही योजना सुरू केली, पण त्यात भ्रष्टाचार शिरला असून वरकमाईला सरावलेले आणि सर्वसामान्य नागरिकांना भूलथापा देत शासनाची फसवणूक करणार्या एजंटांचे पेव फुटले होते. आता नव्या नियमावलीमुळे एजंटांची दुकानदारी बंद होणार आहे.
तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित कामगाराचा थम्ब व फेस आयडी घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र हे त्याच ठिकाणी सांगितले जाऊ शकते. यामुळे बांधकाम कामगाराची प्रत्यक्ष ओळखपरेड न होता जी नोंदणी केली जात होती ते आता पूर्णतः बंद होणार आहे. नूतनीकरणावेळीही याच पद्धतीने प्रक्रिया करावी लागणार आहे.
आतापर्यंत 1500 ते 2 हजार रुपये घेऊन मोबाईल अॅपवर हा गोरख धंदा चालत होता. त्यामध्ये बांधकाम कामगार कोण हे पाहिले जात नव्हते. आता मंडळाने हे अॅप बाहेर देण्याचे बंद केले. त्यामुळे मोबाईलवर चालणारा धंदा बंद होणार असल्याने अनेकजण बेचैन झाले आहेत. त्यांनी अॅप सुरू करा, अशी मागणी करून नेत्यांकडून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बांधकाम कामगारांना मंडळामार्फत भांडी वाटप केली जातात. कोल्हापुरातील मार्केट यार्डात हे भांडी वाटपाचे ठिकाण आहे. तेथे गळाभरून दागिने, उच्च वेशभूषा करून आणि चारचाकी गाड्यातून येऊन अनेक महिलांनी भांडी नेली. नव्या नियमावलीमुळे खरे बांधकाम कामगार पुरुष आणि महिला कोण आहेत, हे स्पष्ट होणार आहे.