Blood Donation | महाराष्ट्रात पंचवीस वर्षांत रक्तदानाचे प्रमाण आले निम्म्यावर Canva
कोल्हापूर

Blood Donation | महाराष्ट्रात पंचवीस वर्षांत रक्तदानाचे प्रमाण आले निम्म्यावर

रक्तदात्यांची उदासीनता राज्यासाठी चिंताजनक; ‘रक्ताच्या नात्याला’ लागत चाललीय घरघर!

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यातील रक्तदानाचे प्रमाण चिंताजनक पातळीपर्यंत खालावत चालले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत रक्तदात्यांचे प्रमाण निम्म्यावर येऊन ठेपले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्याला अभूतपूर्व अशा रक्त टंचाईचा सातत्याने सामना करावा लागत आहे. रक्तदात्यांची उदासीनता राज्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

आज राज्यातील कोणत्याही रक्तपेढीकडे पाच-पन्नास बाटल्यांपेक्षा जादा रक्तसाठा असलेला आढळून येत नाही. ज्या रुग्णालयांच्या स्वत:च्या मालकीच्या रक्तपेढ्या आहेत, त्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून आणि मित्रमंडळींकडून सक्तीने रक्त संकलन केले जात असल्यामुळे अशा रुग्णालयांकडे पुरेसा रक्तसाठा आढळून येतो. मात्र, ज्या अन्य खासगी अथवा सेवाभावी रक्तपेढ्या आहेत, त्यांच्याकडे सततची रक्तटंचाई जाणवताना दिसते. रक्त संकलनासाठी सातत्याने उपाययोजना करूनही राज्यातील एकाही रक्तपेढीकडे आज गरजेच्या तुलनेत मुबलक रक्तसाठा आढळून येत नाही.

रक्तपेढ्यांची कसरत!

रक्ताची ही कमतरता भरून काढण्यासाठी आजकाल रक्तपेढ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. पंचवीस वर्षांपूर्वी साधारणत: राज्यभरात वार्षिक 7 हजार रक्तदान शिबिरे व्हायची आणि त्या माध्यमातून राज्यात आवश्यकतेच्या प्रमाणात रक्त संकलन व्हायचे. मात्र, आजकाल राज्यातील रक्तदान शिबिरांची वार्षिक संख्या तब्बल 35 हजारांच्या घरात गेली आहे. दिवसभर थांबून थांबून रक्तपेढ्यांच्या पदरात रक्ताच्या केवळ पाच-पन्नास बाटल्या पडत आहेत.

रक्तदात्यांची उदासीनता!

पूर्वी वेगवेगळ्या प्रसंगानुरूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे होत होती. महाविद्यालयांमध्ये, सण-समारंभांच्या निमित्ताने, काही राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत अशा प्रसंगोचित रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटत चालले आहे. कुणी अशा निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केलेच तर त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

जनजागृतीची गरज!

राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेला रक्ताचा तुटवडा आणि रक्तदात्यांमधील उदासीनता विचारात घेता याबाबतीत आता नव्याने जनजागृती करण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे. सामाजिक संस्था-संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये, राजकीय पक्ष-संघटना यांच्या माध्यमातून रक्तदान चळवळीला नव्याने गती देण्याची आवश्यकता व्यक्त होऊ लागलेली दिसत आहे. (उत्तरार्ध)

असे घटत गेले रक्त बाटल्यांचे प्रमाण

25 वर्षांचा आढावा घेतला तर वर्षागणिक रक्तदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले

2001 मध्ये रक्तदान शिबिरांत प्रतिशिबिर सरासरी 100 बाटल्या रक्त गोळा होत असे

2005 मध्ये हे प्रमाण सरासरी 83 रक्त बाटल्यांवर येऊन ठेपले आहे

2010 मध्ये हा आकडा आणखी कमी म्हणजे 76 बाटल्यांपर्यंत खाली आला

2015 मध्ये हेच प्रमाण आणखी खालावून 63 बाटल्यांपर्यंत गेले

2020 मध्ये हे प्रमाण सरासरी प्रतिशिबिर 59 बाटल्यांपर्यंत घसरले

55 बाटल्यांपर्यंत घसरलेली आहे सध्या रक्तदानाची ही सरासरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT