कसबा बावडा : येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पाहणीप्रसंगी मंत्री पंकजा मुंडे. सोबत महापौर रूपाराणी निकम, आमदार अमल महाडिक, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आदी.  (छाया : पवन मोहिते)
कोल्हापूर

Pankaja Munde | पंचगंगा पुनरुज्जीवन प्रक्रियेला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील नदी पुनरुज्जीवन प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंचगंगेसह चार नद्यांचा समावेश असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी दिली. यामुळे कोल्हापूरची जीवनवाहिनी पंचगंगा निर्मळ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुंडे म्हणाल्या, नदी पुनरुज्जीवन योजनेत प्रदूषित व अतिप्रदूषित नद्यांचा समावेश आहे. या योजनेसाठी नद्यांचे तीन टप्प्यांत पुनरुज्जीवन केले जाईल. या योजनेनुसार पंचगंगा नदी पुनरुज्जीवनाचा डीपीआर तयार केला जाईल. यानंतर आयआयटी, निरी यासारख्या संस्थेकडून सर्वेक्षण होईल. नदीचे नैसर्गिक स्रोत वाचवणे आणि पंचगंगेचे प्रदूषण कमी करणे, याबाबतचा आराखडा निश्चित केला जाईल, असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.

या योजनेसाठी राज्यात नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना केली असून त्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आता याबाबतची कंपनी स्थापन केली जात आहे. यानंतर कंपनीकडून योजनेसाठी निधी उभारला जाईल. सोबतच या योजनेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ २ हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. सर्व मायनिंगमधून मिळणाऱ्या रॉयल्टीमधील काही हिस्सा यासाठी देण्यात येणार आहे.

७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पंकजा मुंडेंकडून पाहणी

कसबा बावडा : शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी प्रदूषणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या लाईन बाजार, कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. प्रकल्पात सुरू असलेल्या कामाची माहिती घेत त्यांनी सांडपाणी शुद्धीकरणाची प्रत्यक्ष प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पात सध्या येणारे सांडपाणी तुलनेने कमी प्रदूषित असल्याचे निरीक्षण मंत्री मुंडे यांनी पाहणी दरम्यान नोंदवले. शहरातील जयंती नाला, बापट कॅम्प नाला आणि लाईन बाजार नाला या तीन प्रमुख नाल्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे आणले जाते. येथे सिक्वेन्सिंग बॅच रिॲक्‍टर पद्धतीचा वापर करून सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली. या प्रक्रियेमुळे सांडपाण्याचे सुमारे ८० ते ९० टक्क्यांपर्यंत शुद्धीकरण होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता, प्रकल्पाची क्षमता आणि प्रत्यक्ष कार्यपद्धती याबाबतही मंत्री मुंडे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

पाहणीदरम्यान मंत्री मुंडे यांनी सांडपाणी साठवणूक टाक्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. सांडपाणी प्रकल्पात दाखल झाल्यानंतर त्यावर कोणत्या टप्प्यांमध्ये प्रक्रिया केली जाते, त्यातील प्रदूषक घटक कसे कमी केले जातात आणि प्रक्रिया झाल्यानंतर पाण्याची गुणवत्ता कशी राखली जाते, याची माहिती त्यांनी घेतली. शहरातील नाल्यांचे पाणी प्रक्रिया न करता नदीत मिसळू नये, तसेच सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने अशा प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर ७६ एमएलडी प्रकल्पाच्या कामाची मंत्री मुंडे यांनी केलेली पाहणी महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT