कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये शिरोळ, इचलकरंजी व चंदगडसाठी सुरू असलेली ताणाताणी शनिवारी संपली. काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये शिरोळमधून काँग्रेसने गणपतराव पाटील यांना तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून इचलकरंजीतून मदन कारंडे व चंदगडमधून नंदा बाभूळकर-कुपेकर यांच्या नावाचा समावेश आहे; बहुचर्चित कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने राजेश लाटकर यांना संधी देत विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना उमेदवारी नाकारली आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये अजूनही घमासान सुरूच आहे. या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला या मतदारसंघातील निर्णय प्रलंबित आहे. जागावाटपात काँग्रेसने शिरोळची जागा प्रतिष्ठेची केली होती. शिवसेना ठाकरे गट या जागेसाठी आग्रही होता. या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपदही दिले होते; परंतु शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर शिरोळमधून उल्हास पाटील निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने या जागेचा आग्रह धरला होता. आठवड्यापूर्वी ही जागा काँग्रेसला सोडण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले; परंतु शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा या जागेसाठी जोर लावला. त्यामुळे दोन्ही पक्षांत वाद होता. अखेर शिरोळ मतदारसंघ मिळविण्यात काँग्रेसला यश आले. या मतदारसंघातून गणपतराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
इचलकरंजी आणि चंदगड विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू होती. या दोन्हीतील एकही मतदारसंघ मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा ‘चिन्ह तुमचं, उमेदवार आमचा’ हा पॅटर्न राबविण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. शरद पवार गटाच्या वतीने चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ. बाभूळकर यांचे नाव जवळपास निश्चित होते, पण हा उमेदवार बदलावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती; परंतु शरद पवार यांच्यापुढे काँग्रेसच्या नेत्यांना शांत बसावे लागले. या मतदारसंघातून डॉ. बाभूळकर यांच्या नावावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने शिक्कामोर्तब करण्यात आले.
इचलकरंजी मतदारसंघावर देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. त्यामुळे या जागेसाठी देखील जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाला असून पक्षाने मदन कारंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माजी आमदार चंद्रदीप नरके यांची उमेदवारी जाहीर केली असताना जनसुराज्य शक्ती पक्षानेही या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे माघारीपर्यंत जनसुराज्य शक्ती काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.