Maharashtra highway accidents |राज्यातील तीन प्रमुख महामार्गांवर तीन वर्षांत दोन हजार अपघाती मृत्यू 
कोल्हापूर

Maharashtra highway accidents |राज्यातील तीन प्रमुख महामार्गांवर तीन वर्षांत दोन हजार अपघाती मृत्यू

सर्वाधिक 1,589 मृत्यू मुंबई-पुणे-कोल्हापुरातून जाणार्‍या एनएच-48 महामार्गावर; खराब रस्ते, खड्डे, अतिवेगामुळे अपघातांचे प्रमाण अधिक

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : खराब रस्ते, खड्डे, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग, हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह यासह असंख्य कारणांमुळे राज्यातील महामार्ग मृत्यूचे सापळे बनत आहेत. गेल्या तीन वर्षांत एनएच 48, एनएच 61 आणि एनएच 160 या तीन प्रमुख महामार्गांवर 4,155 अपघात घडले आहेत. यामध्ये 2,111 जणांचा मृत्यू, तर 3,217 जण जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मुंबई-पुणे-कोल्हापूरातून जाणार्‍या एकट्या एनएच-48 महामार्गावर 3,287 अपघात झाले असून, त्यात 1,589 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रातील रस्ते सुरक्षा आणि देखभालीच्या द़ृष्ट ीने नॅशनल हायवे 48, 61 आणि 160 हे अत्यंत महत्त्वाचे मार्ग आहेत. एनएच 48 हा मुंबई-पुणे-कोल्हापूर-बंगळूरकडे जाणारा राज्यातील सर्वात व्यस्त महामार्ग आहे. एनएच 61 हा ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून सुरू होऊन अहमदनगर आणि नांदेडमार्गे तेलंगणाकडे जातो. तर, एनएच 160 हा ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. महाराष्ट्रातील या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर खड्डे आणि वाढत्या अपघातांमुळे उद्भवलेली स्थिती गंभीर आहे. रस्ते देखभालीच्या कामात हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या कंत्राटदारांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई सुरू केली असून, 103.75 कोटी रुपयांचा दंड कंत्राटदाराला ठोठावला आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत महामार्ग दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी 1,747 कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातील 1,452 कोटी रुपये दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी खर्च करण्यात आले आहेत.

पुणे-सातारा महामार्गाच्या देखभालीतील त्रुटींसाठी सर्वाधिक दंड

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरवस्थेबाबत केंद्र सरकारच्या माहितीनुसार, रस्ते देखभालीत अक्षम्य हलगर्जीपणा करणार्‍या कंत्राटदारांना एकूण 104.82 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक 76.10 कोटी रुपयांचा दंड पुणे-सातारा महामार्गाच्या देखभालीतील त्रुटींसाठी ठोठावण्यात आला.

9.86 कोटींचा रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर दंड

रत्नागिरी-कोल्हापूर (एनएच1 66) महामार्गावर रस्ता वाहतूकयोग्य न ठेवल्याबद्दल तीन वेगवेगळ्या पॅकेजसाठी सुमारे 9.86 कोटी रुपये दंड आकारण्यात आला असून, एका कंत्राटदाराला तर 8 महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT