राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळी शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने करून महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची मागणी केली.  Pudhari Photo
कोल्हापूर

साताऱ्यातील महाराणी ताराराणींची समाधी दुर्लक्षित; कोल्हापुरात इंडिया आघाडीचे आंदोलन

Maharani Tararani Samadhi | जीर्णोद्धार न केल्यास १६ मेरोजी जनआंदोलन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा: मुघलमर्दिनी करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांची सातारा जिल्ह्यातील संगममाहूली इथं असणारी समाधी दुर्लक्षित असल्याने समाधीचा जीर्णोद्धार करण्यात यावा, या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीने आज (दि.१६) कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळी शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने करून महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची मागणी केली. या मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. (Maharani Tararani Samadhi)

दरम्यान, सातारा जिल्ह्यात छत्रपती घराण्यातील उदयनराजे खासदार आहेत, शिवेंद्रराजे मंत्री आहेत, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई देखील सातारा जिल्ह्यातीलच आहेत.

सातारा जिल्ह्यात एवढी मंत्र्यांची फौज असताना छत्रपती महाराणी ताराराणींच्या समाधीचा जीर्णोद्धार होत नाही. त्यासाठी शिवप्रेमींना आंदोलन करावे लागते. ही दुर्दैवाची गोष्ट असल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. शिवाय खासदार आणि मंत्र्यांनी अंतर्मुख होऊन तातडीने महाराणी ताराराणींच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्याच्या आत महाराणी ताराराणींच्या समाधीचे काम सुरू करावे, अन्यथा दि. १६ मेरोजी ताराराणींच्या समाधीवर अभिषेक घालून जन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT