Smart Meters | महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात 11.49 लाख स्मार्ट टीओडी मीटर 
कोल्हापूर

Smart Meters | महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात 11.49 लाख स्मार्ट टीओडी मीटर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील वीज ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 8 हजार 664 तर सांगली जिल्ह्यात 4 लाख 41 हजार 134 असे एकूण 11 लाख 49 हजार 798 स्मार्ट टीओडी मीटर कोल्हापूर परिमंडलामध्ये बसविण्यात आले आहेत. उर्वरित वीज ग्राहकांना स्मार्ट टीओडी मीटर बसवून घेण्याचे आवाहन कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 6 लाख 35 हजार 57 लघुदाब ग्राहक, 1 हजार 124 उच्चदाब ग्राहक, 51 हजार 351 लघुदाब नवीन विद्युत जोडणी, 52 उच्चदाब नवीन जोडणी, 1 हजार 204 वीजवाहिनी, 18 हजार 309 वितरण रोहित्र, 774 पुनर्जोडणी, तर 793 वीज निर्मिती प्रकल्प/ केंद्र यांना स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.

वीज बिल तक्रारी नगण्य; टीओडीचा सहा कोटींचा लाभ

कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी, पन्हाळा, कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड या तीन उपविभागांत 100 टक्के स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले असून येथील वीज बिलाच्या तक्रारी जवळपास नगन्य झाल्या आहेत. तर स्मार्ट टीओडी मीटरमुळे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरणार्‍या ग्राहकांना चालू आर्थिक वर्षात 85 पैसे इतकी सवलत मिळत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील स्मार्ट टीओडी मीटर वापरणार्‍या ग्राहकांना त्यांच्या मासिक बिलातून मागील नऊ महिन्यात 6 कोटी 41 लाखांची टीओडी सवलत दिली आहे.

स्मार्ट मीटरमुळे शंभर टक्के अचूक देयके मिळतात तसेच ग्राहकांना त्यांचा दर तासानुसार होणारा विजेचा वापर महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपवर समजतो, यामुळे अधिक पारदर्शकता निर्माण होत आहे. स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत. ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘वीज मीटर’; महावितरणचा अधिकार

योग्य मानकाचे मीटर बसवणे, आवश्यकतेनुसार बदलणे हा अधिकार महावितरणचा आहे. वीज पुरवठा करणार्‍या मीटरची मालकी महावितरणची असल्याने हे मीटर बदलताना ग्राहकाच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. महाराष्ट्र शासन, भारत सरकारच्या सूचनेनुसार सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ग्राहकांचे जुने मीटर हे कुलुपबंद जागेत/ठिकाणी असतील तर ग्राहकांशी संवाद साधूनच असे मीटर बदलण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT