Mahad-Raigad National Highway : महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाचे “छत्रपती महामार्ग” असे नामकरण करण्यात येणार : नितीन गडकरी Pudhari Photo
कोल्हापूर

Mahad-Raigad National Highway : महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाचे “छत्रपती महामार्ग” असे नामकरण करण्यात येणार : नितीन गडकरी

रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नांना यश

पुढारी वृत्तसेवा

नाते : रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा. नितीन गडकरी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेत रायगडाच्या दिशेने जाणाऱ्या महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या रस्त्याचा ऐतिहासिक आणि भावनिक वारसा लक्षात घेता त्याला “छत्रपती महामार्ग” असे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. या बैठकीतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती मा. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी समाज माध्यमाद्वारे जाहीर केली.

काही दिवसापूर्वीच महाड येथे आपल्या नियोजित किल्ले रायगड भेटी करता आले असताना झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी यासंदर्भात संकेत दिले होते. पूर्वी छोटा व वळणावळणाचा असलेला हा रस्ता 206 कोटींच्या निधीमधून विकसित होत आहे. जवळपास ९०% काम पूर्ण झाले असून, शिवराज्याभिषेकाच्या काळात होणारी लाखों शिवभक्तांची ऐतिहासिक गर्दी आणि नियमित वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोठी सुविधा ठरते आहे.

या महामार्गाला सुमारे सात वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन हा मार्ग चौपदरी करण्याचा आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिला होता. या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास, पथदिवे, विश्रांतीस्थळे, ऐतिहासिक शिल्पं व सांस्कृतिक दर्शन घडवणारे घटक असावेत, अशी संकल्पना संभाजी राजे यांनी मांडली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वाढीव निधीची तरतूद कशी करता येईल यावरही मार्गदर्शन केले असे संभाजी राजे छत्रपती यांनी आपल्या समाज माध्यमांवर नमूद केले आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT