आशिष शिंदे
कोल्हापूर : कोल्हापुरी उत्पादनांची ओळख आता केवळ महाराष्ट्रापुरती किंवा देशांतर्गत बाजारपेठेपुरती मर्यादित राहिलेली नाही. मेड इन कोल्हापुरी उत्पादनांचा प्रवास सातासमुद्रापार पोहोचला आहे. अभियांत्रिकी उत्पादनांपासून कापड, तांदूळ, काजू, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स आणि रसायनांपर्यंत विविध उत्पादनांना जागतिक बाजारपेठांचे दरवाजे खुले झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत कोल्हापुरातून सुमारे ५ हजार ५०० कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. एकूण ५९१.३५ दशलक्ष डॉलरच्या निर्यातीत पारंपरिक उद्योगांसह नव्या उत्पादन क्षेत्रांनीही वैश्विक बाजारपेठेत आपली उपस्थिती ठळक केली आहे.
केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अहवालानुसार निर्यात मूल्याच्या बाबतीत अभियांत्रिकी वस्तूंचा सर्वाधिक वाटा आहे. या क्षेत्रातून २७१.५ दशलक्ष डॉलरची निर्यात झाली. त्याखालोखाल कापूस धागा, कापड, मेड अप्स आणि हातमाग उत्पादनांची निर्यात १४७.९८ दशलक्ष डॉलर झाली. या दोन क्षेत्रांनी एकूण निर्यातीला मोठा आधार दिला आहे.
पारंपरिक उद्योगांची ओळख जपत कोल्हापूरच्या उत्पादन क्षेत्राने निर्यातीच्या नव्या वाटा खुल्या केल्या आहेत. विविध उत्पादन क्षेत्रांचा निर्यातीत सहभाग वाढत असल्याने कोल्हापूरच्या उद्योगविश्वाची जागतिक बाजारपेठेतील व्याप्ती अधोरेखित होत असून, ‘मेड इन कोल्हापूर’ उत्पादनांना जागतिक स्तरावर मिळणारी ओळख स्थानिक उद्योगांसाठी नव्या संधींचे दार उघडत आहे.
कोल्हापूरच्या निर्यात व्यापाराचे क्षेत्रनिहाय चित्र (जानेवारी ते सप्टेंबर २०२६)
निर्यात क्षेत्र निर्यात (दशलक्ष डॉलर)
अभियांत्रिकी वस्तू २७१.५०
कापूस धागा, कापड, मेड-अप्स, हातमाग १४७.९८
अन्य उत्पादने १०२.५०
तांदूळ १८.३७
सेंद्रिय व असेंद्रिय रसायने ७.६७
औषधे व औषधनिर्मिती ७.१६
रत्ने व दागिने ६.८३
इलेक्ट्रॉनिक वस्तू ६.१५
प्लास्टिक व लिनोलियम ४.८८
कृत्रिम धागा व कापड ३.६१
धान्य प्रक्रिया व अन्य खाद्यपदार्थ ३.४६
रेडिमेड वस्त्रे ३.१५
अन्य तृणधान्ये २.०८
पेट्रोलियम उत्पादने १.८९
फळे व भाजीपाला १.२०
काजू ०.८०
हस्तकला ०.७९
तेलपेंड ०.३९
अभ्रक, कोळसा व अन्य खनिजे ०.४१
सिरॅमिक व काच उत्पादने ०.४३
मसाले ०.०३३