कोल्हापूर : दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संंलग्न कंपन्यांचा एजंट अमित अरुण शिंदे (वय 47, रा. सिल्व्हर ग्लेडस् अपार्टमेंट, लिशा हॉटेलजवळ, शाहूपुरी) याची सुमारे 60 लाखांहून अधिक किमतीची आलिशान मोटार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी पुण्यातून जप्त केली.
अमित शिंदे यास फसवणुकीच्या गुन्ह्यात ऑगस्ट 2023 मध्ये अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. संशयिताची पत्नी आर्या शिंदे हिच्या नावे असलेली मोटार पुण्यातील कोथरूड येथील शोरूममध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने कारवाई केली. दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न विविध कंपन्यांचे पदाधिकारी, संचालक, एजंटांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह 7 राज्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केली आहे. त्यानंतर कंपनीच्या कार्यालयासह शाखांना टाळे ठोकून संशयित पसार झाले होते.
संशयितांना अटक करून त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही मोटार पुण्यातील एका शोरूममध्ये ठेवल्याची माहिती एल. एल. पी. कंपनीविरोधी कृती समितीचे विश्वजित जाधव, गौरव पाटील व रोहित ओतारी यांनी तपासाधिकार्यांना दिली. हवालदार विजय काळे, राजू येडगे, राजेंद्र वरंडेकर यांनी संबंधित मोटार जप्त करून कोल्हापुरात आणली आहे.