कोल्हापूर : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बुधवारी (दि. 31) रात्री 12 वाजेपर्यंतच लाऊडस्पीकर वाजणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 31 डिसेंबर रोजी ध्वनीवर्धक आणि ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्याचा आदेश काढला आहे. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 अंतर्गत वर्षातील एकूण 15 दिवसांसाठी विहित मर्यादेत रात्री 12 पर्यंत सवलत देण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. यापूर्वी जिल्ह्यात 14 दिवसांची सवलत देण्यात आली होती, आता 31 डिसेंबर शेवटचा 15 वा दिवस सवलतीअंतर्गत घोषित करण्यात आला आहे.
या सवलतीबाबत प्रशासनाने काही अटींचे पालन करणे बंधनकारक केले आहे. या आदेशानुसार ध्वनीक्षेपकांचा वापर केवळ विहित आवाजाची मर्यादा राखूनच करता येईल. ही सवलत रुग्णालय, शैक्षणिक संस्था किंवा ‘शांतता क्षेत्र’ (सायलेंन्स झोन) म्हणून घोषित केलेल्या परिसरासाठी लागू असणार नाही. तसेच, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक लावण्यासाठी संबंधित पोलीस विभागाची पूर्वपरवानगी घेणे नागरिकांना बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.