एकनाथ नाईक
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीतील कानठळ्या बसविणाऱ्या साऊंड सिस्टीमच्या दणदणाटाचा परिणाम केवळ कानांवरच नव्हे, तर हृदय आणि मेंदूवरही होऊ शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या दोन वर्षांत विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अहवालातून समोर आले आहे. आवाजाची पातळी तब्बल १००.७ डेसिबलपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. त्याचा हृदय, मेंदूलाही धोका असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
मोठ्या आवाजाच्या सततच्या संपर्कामुळे शरीरात ताण निर्माण होतो. हृदयाची धडधड आणि रक्तदाब वाढतो. आधीपासून हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होतो. गर्दीत साऊंड सिस्टीमच्या अगदी जवळ नाचताना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊन अस्वस्थताही वाढू शकते. तीव्र आवाजामुळे मेंदूवरही ताण येऊ शकतो. चक्कर येणे, डोके दुखणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, अस्वस्थ वाटणे, कानात आवाज येणे, अशी लक्षणे दिसू शकतात. मोठ्या आवाजाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे श्रवणशक्ती कायमची कमी होण्याचाही धोका आहे.
घरगुती उपचार टाळा
हृदय आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी साऊंड सिस्टीमपासून सुरक्षित अंतर ठेवावे. छातीत धडधड, श्वास घेण्यास त्रास, चक्कर किंवा अचानक अस्वस्थता जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. घरगुती उपचार टाळावेत.
शरीरात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. पाण्याजवळ मोठा आवाज झाल्यावर जसा तरंग उडतो, तसाच परिणाम मोठ्या आवाजाच्या फ्रिक्वेन्सीमुळे मानवी शरीरावर होतो. या तीव्र ध्वनीलहरींमुळे रक्ताचा प्रवाह विस्कळीत होऊन रक्त घट्ट बनते व रक्ताच्या गाठी तयार होतात. या लहरींचा आवाज मेंदू, हृदय आणि किडनी अशा अवयवांना हादरवून टाकतो. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या आवाजापासून स्वतःचा बचाव करावा.डॉ. अर्जुन आडनाईक, हृदयरोग तज्ज्ञ