कागल; पुढारी वृत्तसेवा : अदानी ग्रुपने चालवण्यासाठी घेतलेला कागल येथील आरटीओ चेक पोस्ट नाका कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू होऊ दिला जाणार नाही. यासाठी नाक्यावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदान येथे देखील तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक तीन दिवस बंद ठेवली जाईल, असा इशारा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शंभरहून अधिक वाहनासह असोसिएशनचे पदाधिकारी नाक्यावर जमा झाले होते. यावेळी आय आर बी कंपनीला जसे हाकलून दिले तसेच अदानी ग्रुपलाही हाकलून दिले जाईल असा इशारा देण्यात आला.
खासगी टोल नाका बंद करा, नाका लादणाऱ्या सरकारचा निषेध असो, असोसिएशन एकजुटीचा विजय असो, अशा विविध प्रकारच्या घोषणांनी नाका परिसर दणाणून गेला. कागल येथील चौपदरी महामार्गावर आरटीओ चेक पोस्ट नाका उभारण्यात आला आहे. हा नाका गेल्या चार-पाच वर्षापासून बंद आहे. आरटीओ चेक पोस्ट नाका अदानी ग्रुपने चालवण्यासाठी घेतलेला आहे. तसेच येत्या काही दिवसात सुरू करण्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने नाक्यावर मोर्चा काढण्यात आला. त्याचबरोबर कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली. मोर्चाच्या वतीने नाका प्रशासनाला नाका सुरू न करण्यासाठी निवेदन देण्यात आले.