कोल्हापूर : दहा - पंधरा वर्षांपूर्वी कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात विशी-बाविशीतील मुलीसाठी लग्नासाठी मुलगा असेल, तर सुचवा, असा शब्द नातेवाईंकडे टाकला जायचा. आता हे चित्र 360 अंशांच्या कोनात बदलले असून आमच्या मुलासाठी मुलगी असेल तर शोधा... अशी विनंती लग्नाच्या वयात आलेल्या मुलाचे आई-वडील नातेवाईक, मित्रपरिवाराला करत आहेत.
गेल्या काही वर्षांत मुलींच्या जन्मदरात झालेली घट आणि उच्चशिक्षित मुलींच्या वाढत्या अपेक्षा यामुळे मुलांच्या लग्नाची समस्या गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील वधुवर सूचक केंद्रांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या बायोडेटांची संख्या निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. सध्या बहुतांश वधुवर केंद्रांतील बायोडेटाच्या फाईलमध्ये नजर टाकल्यास मुलांच्या लग्नाचे वय 28 वर्षांवरून पस्तिशी उलटून गेले आहे.
मुलींच्या जन्मदरात घट
गेल्या दोन दशकांत गर्भलिंग निदान, स्त्री भ्रूणहत्या ही प्रवृत्ती वाढल्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी झाले. मुलांच्या तुलनेत हे प्रमाण व्यस्त असल्याने लग्न जुळत नाहीत.
मुलींच्या वाढत्या अपेक्षा
सध्या मुलींच्या अवास्तव अपेक्षा वाढत आहेत. मुलींचे उच्चशिक्षित होण्याचे वाढते प्रमाण, चांगल्या पगाराची नोकरी यामुळे लग्न ठरवतानाच मुलाकडे पगार पॅकेज, गाडी, बंगला असले पाहिजे, यावर मुली अडून बसतात. वैवाहिक आयुष्यात कष्ट किंवा एकमेकांंच्या सोबतीने संसारिक गोष्टी करण्याची मुलींची तयारी नसल्याने मुलांना सतत नकार दिला जात आहे.
मुलांचे मानसिक आरोग्य ढासळतेय
नोकरी आहे, घर आहे, दुचाकी आहे, तरीही मुलींच्या वाढत्या अपेक्षांच्या परिघात बसत नाही, यामुळे नकार पचवावा लागणार्या लग्नाळू मुलांचे मानसिक आरोग्य ढासळत आहे. लग्न ठरत नाही, या कारणाने गेल्या चार ते पाच वर्षांत तीस ते पस्तीस वयातील काही मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.