कोल्हापूर

राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये येणार लोकपाल!

Arun Patil

कोल्हापूर : उच्च शिक्षण घेताना महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावर विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये आता 'लोकपाल' यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागून त्यांना जलद न्याय मिळणार आहे.

उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक समान कार्यपद्धती असावी, यासाठी महाराष्ट्रात विद्यापीठस्तरावर 2019 मध्ये लोकपाल नियुक्तीचा निर्णय झाला. तसेच 11 एप्रिल 2023 रोजी भारताचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये लोकपाल नियुक्तीसंदर्भात कार्यपद्धती दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रत्येक विद्यापीठामध्ये लोकपाल नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार काही विद्यापीठांमध्ये लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.

सध्या देशभरातील सर्वच विद्यापीठांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ची अंमलबजवणी सुरू झाली आहे. शिवाजी विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. पुढील आठवड्यात लोकपाल नियुक्त होणार आहेत. लोकपाल यांचे वय आणि कार्य, कालावधी निश्चित करण्याचे अधिकार विद्यापीठांना असणार आहेत. गुणवत्तेनुसार प्रवेश, प्रवेश अनियमितता, आकारण प्रवेश नाकारणे, अधिकची शुल्क वसुली, आरक्षण नियमाची अंमलबजावणी न करणे, भेदभावपूर्ण वर्तन, शिष्यवृत्ती प्रकरणे, वेळापत्रकानुसार परीक्षा न घेणे, निकाल वेळेत न लावणे, सुविधा न पुरवणे आदींबाबतच्या तक्रारी लोकपाल यांच्या कक्षेत येणार आहेत.

महाविद्यालयस्तरावर तक्रार निवारण समितीचे प्राचार्य अध्यक्ष असतात. विद्यापीठस्तरावरही तक्रार निवारण समिती आहे. पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तक्रारी येतात. त्याचा तत्काळ न्यायनिवाडा केला जातो. परंतु, या ठिकाणी आलेल्या तक्रारींचे निवारण न झाल्यास ते लोकपाल यांच्याकडे न्याय मागू शकणार आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे जाण्याची आता आवश्यकता भासणार नाही. लोकपाल नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणाचा मार्ग सुकर झाला आहे.

शिवाजी विद्यापीठ लोकपाल नियुक्तीचा आज होणार निर्णय

शिवाजी विद्यापीठामध्ये लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव कुलगुरूंच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. सोमवारी याबाबत आदेश होणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुधीर कुलकर्णी यांची लोकपाल म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT