कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात येऊ लागली आहे. उमेदवारीसाठी राजकीय पक्षांकडे लागलेली इच्छुकांची रांग आणि उमेदवारी ठरवताना वापरले जाणारे निकष यामुळे मात्र पक्षातील सर्वसामान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. पैसा हाच एकमेव निकष ठरत असल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून आता धनशक्तीविरोधात थेट बंडाचे संकेत मिळू लागले आहेत.
खासदारपुत्र, आमदारपुत्र, उद्योगपती, श्रीमंत घराण्यातील उमेदवार, तसेच दारू व दोन नंबरच्या व्यवसायाशी संबंधित चेहरे यांनाच प्राधान्य दिले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये प्रबळ झाली आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणारे, प्रभागात लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे कार्यकर्ते मात्र केवळ ‘खर्चाची ऐपत नाही’ या कारणावरून बाजूला फेकले जात असल्याचा आरोप होत आहे.
पूर्वी समाजकारणात सक्रिय असलेले, लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेले सामान्य कार्यकर्ते नगरसेवक म्हणून निवडून येत. आज मात्र ‘त्या प्रभागातील सर्वात श्रीमंत कोण’ हाच निकष धरून उमेदवारी दिली जात आहे. कोल्हापूरच्या इतिहासात 80 च्या दशकात शिवाजी पेठेतील शिवाजीराव चव्हाण विरुद्ध भिकशेठ पाटील यांची निवडणूक आजही आठवली जाते. त्या वेळी सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता उभी राहिली होती. मग, आता सामान्यांनी निवडणूक लढवायचीच नाही का, असा संतप्त सवाल केला जात आहे.
पक्षासाठी रक्त, उमेदवारीसाठी नोटा?
एका माजी महापौरांनी सांगितले की, पक्षासाठी, गटासाठी आम्ही व आमच्या कार्यकर्त्यांनी रक्त सांडले आहे; परंतु उमेदवारी देताना नेत्यांना पैसा व त्यांचा स्वार्थ दिसत असेल, तर हा कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. त्यामुळे अशा पैशाच्या व धनदांडग्यांच्या राजकारणालाही आव्हान देण्याची गरज आहे.
एकास एक उमेदवार देणार?
या पार्श्वभूमीवर महापालिकेचे काही माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि अनुभवी कार्यकर्ते पुढाकार घेत असून धनशक्तीला एकास एक उमेदवार देऊन आव्हान देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची हालचाल सुरू झाली आहे. ही लढाई पक्षविरोधी नसून पैशाच्या राजकारणाविरोधात असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात येत आहेत.