कोल्हापूर : जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्कची उभारणी केली जाणार आहे. याकरीता आवश्यक जागेचा शोध घ्या, असे आदेशच जिल्हाधिकार्यांनी संबधित सर्व विभागांना दिले आहेत. जागेबाबतचे अहवाल प्राप्त होताच पुढील प्रक्रियेला कालबद्ध पद्धतीने गती द्या, अशा सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.
महाराष्ट्र लॉजिस्टिक पॉलिसी-2024 अंतर्गत आतंरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक जिल्हा, प्रादेशिक व राज्य स्तरावरील लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार आहेत. जिल्ह्याची मूलभूत क्षमता, उद्योग व्यवसायाच्या संधी व पारंपरिक कौशल्याच्या आधारे निर्माण झालेली आर्थिक विकासाची केंद्रे याच्या समन्वयातून जिल्ह्यातही लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. याकरीता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. लॉजिस्टिक पार्कमुळे जिल्ह्यातील कृषीसह अन्य उत्पादित मालाची साठवणूक, वितरण, वाहतूक आणि इतर संबंधित सेवा एकाच ठिकाणी मिळतील. लॉजिस्टिक पार्क्समुळे मालाची वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुलभ आणि कार्यक्षम होईल, ज्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल.
जिल्हा आणि प्रादेशिक पार्कसाठी जागेचा शोध
जिल्हास्तरीय पार्कसाठी किमान 100 एकर जागेची आवश्यकता आहे. प्रादेशिक (विभागीय) स्तरावरील पार्कसाठी किमान 300 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यानुसार जिल्ह्यात या दोन्ही पार्कची उभारणी करता येईल का, याद़ृष्टीने जागेचा शोध घेण्याची सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली आहे.
लॉजिस्टिक पार्कमुळे काय होईल?
खर्च कपात : मालाचा वाहतूक खर्च कमी होईल. त्यामुळे वस्तूंच्या किमतीत घट होईल.
कार्यक्षमता : विविध वाहतूक साधनांचा (रेल्वे, रस्ते, हवाई) वापर करून मालाची जलद आणि प्रभावी वाहतूक करता येईल.
रोजगारनिर्मिती : लॉजिस्टिक हबमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होतील.
सुविधा : गोदामांची सोय, कस्टम क्लिअरन्स, माहिती-तंत्रज्ञान सेवा आणि इतर मूल्यवर्धित सेवा उपलब्ध होतील.
8 हजार 310 कोटींची तरतूद
महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 8,310 कोटींची तरतूद करण्यात आली असून, पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सात हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. याअंतर्गत राज्यात 2029 पर्यंत 10 हजार एकरांहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यातून पाच लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.