कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महायुती व महाविकास आघाडीत सत्ता स्पर्धा होणार हे स्पष्ट आहे; पण महायुतीतील घटक पक्षांतच अंतर्गत वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे दौरे हे निवडणुकीतील वर्चस्वासाठीची लढाई किती टोक गाठणार, हे स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत. या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंगच या दौर्यात फुंकले आहे. एप्रिल व मे महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन वेळा दौर्यावर आले होते. मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौर्यावर आले होते.
नेत्यांचे कार्यक्रम राजकीयच असतात. त्यामुळे राजकारणातील बेरीज-वजाबाकीची चर्चा होतच असते. तशीच ती याही दौर्यात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले. इचलकरंजीच्या गाजत असलेल्या पाणी प्रश्नावर फडणवीस यांनी शाश्वत पाणी योजना देण्याची घोषणा केली. इचलकरंजीला पाणी नाही मिळाले, तर शोधून देऊ असे जाहीर करून शहरवासीयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपली संवेदनशीलता दाखवून दिली.
शिवसेना फुटीत शिंदे यांना साथ देणारे प्रकाश आबिटकर यांच्या निवडणूक प्रचारावेळी शिंदे यांनी तुम्ही आबिटकर यांना आमदार करा. त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी असे जाहीरपणे सांगितले होते. शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखविला. ठरल्याप्रमाणे त्यानी आबिटकर यांनी मंत्रीच नव्हे, तर आग्रही भूमिका घेऊन पालकमंत्रीही केले.
आबिटकर यांच्या मतदारसंघात सरवडे (ता. राधानगरी) येथे झालेल्या मेळाव्यातच शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले. हिंदुत्वाचे विचार सोडणार्यांना व भ—ष्ट काँग्रेसला जनतेने पराभूत केल्याचे सांगून शिंदे यांनी खोडा घालणार्यांना जनतेने जोडा दाखविल्याचे सांगत संघटनेचा पाया मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन केले.
महाविकास आघाडीला जनतेने दिलेल्या जमालगोट्याने त्यांचा टांगा पलटी व घोडे फरार झाल्याचे शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या वक्तव्याचा प्रत्यय काही दिवसांतच आला. आबिटकर यांच्याविरुद्ध ठाकरे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविलेले बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी ठाकरे शिवसेनला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने तेथे महायुती मजबूत झाली.
के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांचे अलीकडच्या काळातील सख्य विळ्याभोपळ्याचे; मात्र फिरून फिरून हे मेहुणे-पाहुणे परत एकाच पक्षाच्या झेंड्याखाली आले आहेत. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या तेव्हा के. पी. यांनी ए. वाय. यांच्या गावाचा उल्लेख सोळांकूरचा नाका उठला असा केला होता. त्यावर ए. वाय. यांनी याच नात्याने तुम्हाला आमदार केल्याचा टोला लगावला होता. आता त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कस लागणार आहे.
के. पी. पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अजित पवार यांनी महायुती म्हणून एकत्र असलो तरी प्रत्येकाला आपला राजकीय पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याचे सांगून येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक महापौर, नगराध्यक्ष, नगरपंचायत, जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती निवडून आले पाहिजेत. राष्ट्रवादीचा झेंडा सर्वत्र फडकला पाहिजे, असे आवाहन केले.
महायुती भक्कम होत असताना महाविकास आघाडी मात्र आकसत आहे. कोल्हापूर महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते शारंगधर देशमुख शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. के. पी. पाटील अजित पवार राष्ट्रवादीत, तर संजय घाटगे भाजपमध्ये गेले आहेत. अन्य छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होत आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने तिरंगा रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले, तर ठाकरे शिवसेनेने शहरात राबवलेल्या विकासकामांतील फोलपणावर बोट ठेवले आहे. शरद पवार राष्ट्रवादीचा मेळावा झाला. त्यामुळे आजच्या घडीला महायुती ताकद वाढवित आहे, तर महाविकास आघाडीला आपली ताकद टिकवून ठेवायची कसरत करावी लागत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच दिवशी कोल्हापुरात आले होते. पवार यांचा आबिटकर यांच्या मतदारसंघात कार्यक्रम होता; मात्र तो आबिटकर यांच्या कट्टर राजकीय विरोधकाचा होता. त्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे आबिटकर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला इचलकरंजीत हजर होते.
इचलकरंजी महापालिकेच्या जीएसटीचा परतावा मिळावा, अशी मागणी आ. राहुल आवाडे यांनी केली. त्यावर फडणवीस यांनी तातडीने हे अनुदान दिले जाईल आणि पाचच दिवसांत इचलकरंजी महापालिकेला 657 कोटी रुपये परताव्यापोटी पाच वर्षांत दिले जातील, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. एकेकाळी श्रीमंत नगरपालिका असा इचलकरंजीचा लौकिक होता. आता नव्या निर्णयाने महापालिकाही श्रीमंत होणार आहे.