Local Body Elections | दावा सत्तेचा; कस नेत्यांचा  Pudhari File Photo
कोल्हापूर

Local Body Elections | दावा सत्तेचा; कस नेत्यांचा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत रंगणार वस्त्रहरण

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सत्तेचा दावा करीत आणि कोणत्याही परिस्थितीत महापौर आमचाच म्हणत काँग्रेस व शिंदे शिवसेनेने प्रचाराचा नारळच फोडला आहे. सत्तेचा दावा सांगताना नेत्यांचा कस लागणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सलामीला झडल्या असून या निवडणुकीत नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी वस्त्रहरणाचा प्रयोग रंगण्याची चिन्हे आहेत.

सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघांचे प्रारूप जाहीर झाले आहे. त्यावर हरकती आणि दावे घेण्यात आले असून त्यावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर या मतदारसंघांना मान्यता मिळेल आणि निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होईल; मात्र त्यापूर्वीच मेळाव्यातून मोर्चेबांधणी केली जात असून आपली ताकद अजमावली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि शिंदे शिवसेना यांनी आघाडी घेतली आहे. या दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन एकाच दिवशी झाले. शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेत आणि विकासकामांचा डोंगर उभा केल्याचे सांगत शिंदे शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडला. जिल्ह्यात एक खासदार आणि पाच आमदार असल्याचा दावा करीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वाधिक सदस्य आणि पदेही आपल्याच पक्षाकडे असतील यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचा मंत्र देण्यात आला. शिंदे शिवसेनेने या मेळाव्यातून आपली ताकद दाखविली.

याच दिवशी काँग्रेसचा कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक पूर्वतयारीसाठी मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेवर आमचाच महापौर असेल, अशी घोषणा केली. या निमित्ताने काँग्रेस कमिटी ओसंडून वाहिली आणि काँग्रेसचे शक्तिप्रदर्शनही जोरदार झाले.

दोन्ही पक्षांनी सत्तेचे दावे केले असले तरी खर्‍या अर्थाने सत्ता स्थापन करताना नेत्यांचा कस लागणार आहे. मुळात महायुती आणि महाविकास आघाडी हे कसे लढणार हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला मिळेल त्या ताकदीवर स्वबळाची तयारी करीत आहे, हे लपून राहिलेले नाही. कोल्हापूर महापालिकेसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग राहणार असून जागा वाटप आणि ताकदीचे उमेदवार मिळणे यातच कसोटी आहे. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख शिंदे शिवसेनेत गेल्याने सतेज पाटील यांनी ज्यांना जायचे असेल त्यांनी आताच जा, असा इशारा देत धोका दिल्यास संबंधितांच्या मतदारसंघात तळ ठोकून त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करू, असा इशाराच दिला. यातून पुढचे राजकारण कसे आकाराला येणार हे स्पष्ट होते. माणसे येतात आणि जातात पण जनतेच्या बळावर सत्ता मिळविता येते हे आपण सिद्ध करून दाखविले. आताही त्याचीच तयारी कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

क्षीरसागर-सतेज-शेट्टी

राजेश क्षीरसागर यांनी विकासकामांवरून सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी सतेज पाटील यांना काही प्रश्न विचारले आहेत. आता सतेज पाटील हे त्याला काय उत्तर देतात हे पहावे लागेल. यातून हा संघर्ष महापालिका निवडणुकीत अधिकाधिक धारदार होणार आहे. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. त्याचवेळी क्षीरसागर आणि राजू शेट्टी यांच्यातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शक्तिपीठ महामार्गावरून जमीन आणि मालमत्ता यावरून हा संघर्ष टोकदार होणार आहे.

उद्घाटनालाच संघर्ष

शिंदे शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर नव्या कार्यकर्त्याच्या प्रवेशावरून एकमेकाला खुन्नस देण्याचा प्रकार घडला. असे प्रकार वाढणार आहेत. नवा-जुना संघर्ष उफाळणार आहे. संजय मंडलिक यांच्या विरोधात शाहू महाराज यांचा प्रचार केलेल्या कार्यकर्त्याला शिंदे शिवसेनेत मानाचे पान का, असा सवाल करीत वीरेंद्र मंडलिक यांनी हा संघर्ष अधिक टोकदार होण्याची जाणीव करून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT