Crime News pudhari photo
कोल्हापूर

kolhapur | कर्ज मंजूर कॅन्‍सर रुग्‍णसेवेसाठी; भामट्यांनी वळवले स्‍वतःसाठी

पाचजणांवर गुन्‍हा; चार दिवस पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

हातकणंगले : हेरले (ता. हातकणंगले) येथील मल्टिस्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटलचे नूतनीकरण व अत्याधुनिक रिसर्च सेंटर उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मंजूर झालेल्या साडेसात कोटी रुपयांच्या कर्जाचा कथित अपहार केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी शिल्पा सुशांत फडणीस (वय ४९, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर), प्रांजल शरदचंद्र फडणीस (४९, रा. स्वंयसिद्धी अपार्टमेंट, साईक्स एक्सटेंशन, कोल्हापूर), सतीश नारायण पोतदार (५८, रा. लक्ष्मी नारायण कॉलनी, फुलेवाडी), संतोष भगवान डकरे (४१, रा. कोतवालनगर, फुलेवाडी, कोल्हापूर), छबुबाई पिलाजी कुंजीर (रा. कोल्हापूर) अशी गुन्हे दाखवल झालेल्यांची नावे आहेत. प्रांजल फडणीस, सतीश पोतदार, संतोष डकरे या तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हॉस्पिटलचे मुख्य विश्वस्त तथा निवृत्त शिक्षक अण्णासाहेब चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी कर्ज उभारणीदरम्यान सनदी लेखापाल सुशांत फडणीस यांनी मदतीचे आश्वासन दिले; मात्र मंजूर झालेली साडेसात कोटी रुपयांची रक्कम हृदया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खात्यातून त्यांच्या संबंधित दोन कंपन्यांकडे पाच कोटी व अडीच कोटी रुपये अशी वळविण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले नाही, तसेच आवश्यक वैद्यकीय उपकरणेही पुरविण्यात आली नाहीत.

चौगुले यांनी स्वतः भरलेले कर्जाचे हप्ते, व्याज व इतर रक्कम मिळून सुमारे ५.७२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्‍हटले आहे. या प्रकरणाचा तपास कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू आहे.

तिघांना कोठडी, दोघांचा शोध

बँकेचे हप्ते आणि व्याज मिळून चौगुले यांची एकूण ५ कोटी ७२ लाख २६ हजार ९०८ रुपयांची फसवणूक झाली आहे. अण्णासाहेब चौगुले यांच्या फिर्यादीवरून हातकणंगले पोलिसांनी प्रांजल फडणीस, सतीश पोतदार आणि संतोष डकरे या तिघांना अटक करून ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू असून आर्थिक गुन्हे शाखा याचा पुढील तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT