कोल्हापूर, सुनील सकटे : राज्यात विजेची टंचाई निर्माण झाली असून ऐन पावसाळ्यात जनतेला भारनियमनाचा झटका बसला आहे. कृषी पंपांसह गावठाण फिडर्सवरही फोर्स लोडशेडिंग सुरू झाल्याने शेतकर्यांसह सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एरवी पावसाळ्यात मुबलक वीज असताना यंदा मात्र पावसाळ्यातच लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुरुवारपासून भारनियमन सुरू करण्यात आले आहे.
राज्यात पावसाने ओढ दिल्याने विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वीजटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात तातडीचे भारनियमन (फोर्स लोडशेडिंग) सुरू करण्यात आले आहे. महावितरण कंपनीने वीज बिल वसुली आणि वीज चोरी व गळती या निकषानुसार फिडरचे वर्गीकरण केले आहे. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी 1, जी 2, जी 3 असे गट करून भारनियमनाचे नियोजन केले आहे. विजेची टंचाई सुरू होताच प्रथम जी 3 या गटापासून भारनियमनाची सुरुवात होते.
कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील बहुतांश फिडर ए आणि बी गटात येतात. त्यामुळे सध्या तरी या दोन्ही ठिकाणी भारनियमनाचा फटका बसला नाही. मात्र एजी वन या कृषी फिडरसह आणि जी 3 या गावठाण गटातील फिडरवरून भारनियमन करण्यात येत आहे. जिल्ह्यासह राज्यातील एजी वन या कृषी फिडरवरून वीज पुरवठा होणार्या कृषी पंपांना भारनियमनाचा झटका बसला आहे. या फिडरवरील ग्राहकांचा किमान एक ते दोन तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. फोर्स लोड शेडिंगचा राज्यातील सर्वच कृषी पंप धारकांना भारनियमनाचा झटका बसत आहे.
राज्यातील गावठाण फिडरवर केवळ जी 3 या गटात फोर्स लोडशेडिंग सुरू केले आहे. त्याचा फटका गडहिंग्लज, गगनबावडा आणि चंदगड तालुक्यातील गावांना फटका बसला आहे. या भागासह राज्यातील जी 3 गटात येणार्या गावांना सायंकाळी सहा ते दहा या पिक अवर्समध्ये एक ते दोन तास भारनियमन करण्यात येत आहे. वीज टंचाई वाढत गेल्यास भारनियमनाची गावे वाढण्याची शक्यता आहे.